माधुरी दीक्षित आणि श्रीदेवी यांसारख्या दिग्गज कलाकारांना नृत्य शिकवले त्या सरोज खान यांचे निधन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,3 जुलै 2020 : प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान (७१) यांचे गुरुवारी रात्री उशिरा निधन झाले. श्र्वसनाचा त्रास होत असल्याने गेल्या काही दिवसांपासून त्या मुंबईतील गुरुनानक रुग्णालयात दाखल होत्या.

उपचारादरम्यान रात्री १.५० च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची कोरोना चाचणी केली असता ती निगेटिव्ह आली होती. याशिवाय त्या डायबिटीस आणि त्या संबंधित आजारांनी त्रस्त होत्या.

गेल्या कित्येक दशकांपासून कलाविश्वात आपल्या नृत्यदिग्दर्शनाच्या बळावर वेगळी छाप सोडणाऱ्या सरोज खान यांनी कायमच सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

‘हवा हवाई’, ‘एक दो तीन’, ‘धक धक’ अशा गीतांसाठी नृत्यदिग्दर्शन करणाऱ्या खान यांची चाहत्यांवर आजही तितकीच छाप आहे जितकी काही दशकांपूर्वी होती.

त्यांनी माधुरी दीक्षित आणि श्रीदेवी यांसारख्या दिग्गज कलाकारांना नृत्य शिकवले आहे.दरम्यान, कोरिओग्राफर म्हणून सरोज खान यांचा सिनेसृष्टीत मोठा दबदबा राहीला आहे.

सुमारे २ हजार गाणी त्यांनी कोरिओग्राफ केली आहेत. तीनवेळा त्यांनी उत्कृष्ट कोरिओग्राफीसाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे. चोली के पिछे क्या है.. निंबुडा निंबुडा, या गाण्यांचेही नृत्य दिग्दर्शन सरोज खान यांनी केले आहे.

याशिवाय ‘ देवदास ‘ चित्रपटातील ‘ डोला रे डोला ‘ , ‘ तेजाब ‘ मधील ‘एक दोन तीन’ आणि ‘जब वुई मेट’मधील ‘ये इश्क हाये’ या गाण्यांच्या कोरिओग्राफीसाठी त्यांना हे पुरस्कार मिळाले आहेत.

सरोज खान मध्ये तीन वर्षे बॉलिवूडपासून दूर होत्या. २०१९ मध्ये त्यांनी कमबॅक केले. कंगना रणौतची मध्यवर्ती भूमिका असलेल्या ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झाशी’ चित्रपटातील गाणे सरोज यांनी कोरिओग्राफ केले आहे.

त्याशिवाय कलंक चित्रपटातील गाण्याची कोरिओग्राफीही सरोज यांनी केली आहे. याबरोबरच आधीच्या दशकांत मिस्टर इंडिया, चांदनी, बेटा, तेजाब, नगिना, डर, बाझीगर, अंजाम, मोहरा,

याराना, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, देवदास, ताल, फिजा, स्वदेस, तनू वेड्स मनू, एजंट विनोद, रावडी राठोड या आणि अशा अनेक गाजलेल्या सिनेमांसाठी त्यांनी नृत्य दिग्दर्शन केले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24