श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये सुरू असलेल्या एका सरकारी कार्यक्रमादरम्यान अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात एक सरपंच व फळबाग विभागातील एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला.
काश्मीरमधील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासनाकडून लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी राबविल्या जात असलेल्या ‘बॅक टू व्हिलेज’ कार्यक्रमादरम्यान हा हल्ला झाला.
हल्ल्यानंतर अनंतनागच्या अतिरिक्त उपायुक्तांना तातडीने बैठकीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले. तर सुरक्षा जवान अतिरेक्यांच्या मागावर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हल्ल्यात जखमी झालेल्या अन्य ३ जणांना उपचारासाठी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, श्रीनगर शहराच्या हजरबल भागातील काश्मीर विद्यापीठाच्या सर सय्यद दरवाज्याजवळ दुपारच्या सुमारास झालेल्या स्फोटात ३ जण जखमी झाले. जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.