अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील शाळा व कॉलेज गेल्या अनेक महिन्यांपासून बंद ठेवण्यात आले होते. व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होय नये यासाठी ऑनलाईन क्लासेस सुरु होते.
मात्र आता २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू झालेले असताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तालुक्यात जाण्या-येण्यासाठी बसची सुविधा नसल्याने शैक्षणिक नुकसान होत आहे.
विद्यार्थ्यांच्या गैरसोयीचा प्रकार हा पारनेर तालुक्यात घडला आहे. दरम्यान शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पारनेर तालुक्यातील पारनेर ते पाडळी-रांजणगाव एसटी बसच्या फेऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी पालकांसह ग्रामस्थांमधून केली जात आहे.
म्हसणे सुलतान, बाबुर्डी, भोयरे गांगर्डा, रूई छत्रपती, कडूस, पाडळी रांजणगाव, श्रीगोंदा तालुक्यातील सारोळा सोमवंशी आदी गावांतील विद्यार्थी पारनेर येथील महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत.
२३ नोव्हेंबर २०२० रोजी शालेय शिक्षण विभागाने इयत्ता ९ ते १२ वीच्या शाळा सुरू करण्यात याव्यात, असे आदेश काढले. शहरातील सर्व एसटी बस टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आल्या.
मात्र ग्रामीण भागात अद्याप एसटी बसच्या सेवा बंद असल्याने पालकांसह विद्यार्थ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. विशेषत: शाळा सुरू झाल्यापासून विद्यार्थिनींना शालेय शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.
पालकांकडे दुचाकी असणारे शाळेत दुचाकीवरून जातात. मात्र ज्यांच्या पालकांकडे दुचाकी नाहीत अशा विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.
शासनाच्या वतीने २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंत शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र अद्याप ग्रामीण भागात एसटी बस सुरू नसल्याने मुलांना शाळेत पाठवायचे कसे, या विवंचनेत पालकवर्ग सापडला आहे.