अहमदनगर लाईव्ह 24 टीम / शिर्डी :- साईंच्या शिर्डीत मानवतेला काळिमा फासणारे कृत्य एका तळीरामाने केले.सोन्याच्या मोहापायी चक्क पेटत्या सरणावरील प्रेत खाली उतरविल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. यामुळे परिसरात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
अशा प्रवृत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे. सोने परिधान करण्याची हौस अनेकांना असते. तशी ती शिर्डी परिसरातील एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याला होती. नुकतेच आजारपणात त्यांचे निधन झाले.
गावातील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच गावात एक तळीरामही आहे. दिवसभर दारू प्यायची आणि गावात भटकायचे, असा त्याचा दिनक्रम. कुणीतरी त्याची चेष्टा केली व त्याला सांगितले की, जे प्रतिष्ठित व्यापारी वारले.
त्यांचा अंत्यसंस्कार करताना त्यांच्या अंगावरील सोने त्यांच्या कुटुंबियांनी काढून घेतले नाहीत. हे ऐकून त्या तळीरामाने प्रेतावरील सोन्याच्या आशेने थेट स्मशानभूमी गाठली. अंत्यसंस्कार झाल्यावर मयत व्यापाऱ्याचे कुटुंबीय व नातेवाईक स्मशानभूमीतून निघून गेले.
ही संधी साधत तळीरामाने मृतदेह जळत्या चितेवरून खाली उतरवला आणि सोने तपासू लागला. हा प्रकार कुणीतरी पाहिला व त्या व्यापाऱ्याच्या कुटुंबीयांना कळविले. त्यांचे नातेवाईक घटनास्थळी आले व त्यांनी त्या तळीरामाला रंगेहाथ पकडले.
सर्वांनी मिळून त्याला यथेच्च चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनीही त्याला पोलिसी हिसका दाखविला. त्याच्या विरोधात तक्रार दाखल करा, असा सल्ला पोलिसांनी नातेवाईक व कुटुंबीयांना दिला. परंतु, कुणीही तक्रार न दिल्यामुळे त्याला समज देऊन सोडून दिले.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com