शिर्डी : राज्यातील जनतेने भाजप सरकारला बहुमत दिल्याने भारतीय जनता पार्टीचेच सरकार सत्तारुढ होईल हे निश्चितच होते. आता राज्यपालांनी दिलेल्या कालावधीत सरकार आपले बहुमत नक्कीच सिध्द करेल, असा विश्वास माजी गृहनिर्माण मंत्री तथा भाजपचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
दरम्यान महायुतीचा धर्म पाळला गेला नाही, अशी टिका करणाऱ्या खा. संजय राऊत यांनी आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला ना.विखे पाटील यांनी दिला.
राज्यात भाजपा सत्तारूढ होण्याच्या पार्श्वभुमीवर असताना माजी मंत्री व भाजपाचे जेष्ठ नेते राधाकृ ष्ण विखे पाटील व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना.सौ.शालिनीताई विखे पाटील यांनी मुंबईला रवाना होण्यापुर्वी साईदरबारी हजेरी लावुन साईबाबांचे मनोभावे दर्शन घेत आशिर्वाद घेतले.
यावेळी त्यांचा साईबाबा संस्थानच्या वतीने उप कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नगरपंचायतचे गटनेते अशोक गोंदकर, सामाजिक कार्यकर्ते नितीन उत्तमराव कोते,
उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन,माजी उपनगराध्यक्ष सुजीत गोंदकर, भाजपचे राहाता तालुका सरचिटणीस रविंद्र गोंदकर, ज्ञानेश्वर गोंदकर, हरीश्चंद्र कोते, सुनील गोंदकर, कैलास कातोरे आदी उपस्थीत होते.
यावेळी पत्रकारांशी बोलताना ना.विखे पाटील म्हणाले की,देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात निवडणुक झाली. या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपवर जनतेने विश्वास व्यक्त करत स्पष्ट कौल दिला.
सर्वात मोठा पक्ष भाजप ठरल्याने आमचेच सरकार येईल याची खात्री होती. राज्यपालांनी बहुमत सिध्द करण्यासाठी दिलेल्या कालावधीत आम्ही निश्चितपणे बहुमत सिध्द करु, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महायुतीचा धर्म पाळला गेला पाहीजे होता पण तो दुर्दैवाने पाळला गेला नाही.
खा.संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेत त्यांनी आता आत्मपरीक्षण करावे, असा सल्लाही विखे पा.यांनी दिला. राष्ट्रवादीशी काही आपला वैयक्तीक वाद नाही. त्यामुळे आम्ही सगळेजण मिळुन राज्याच्या हिताचे काम करू,असेही विखे यांनी सांगितले.