Ahmednagar breaking : पक्षाचा महापौर असून प्रभागाच्या विकासासाठी निधी मिळत नसल्याने तसेच स्वपक्षियांकडून दुय्यम वागणूक मिळत असल्याने बोल्हेगाव-नागापूरच्या शिवसेना नगरसेविका कमलताई सप्रे व त्यांचे पती माजी नगरसेवक दत्ता पाटील सप्रे यांनी शिवसेना (ठाकरे गट) संपर्क प्रमुख आ. सुनील शिंदे यांच्याकडे पक्षाचा राजीनामा देत असल्याचे पत्र दिले आहे.
नगरसेविका सप्रे व श्री. सप्रे यांनी शिर्डी येथे विश्रामगृहावर आ. शिंदे यांची भेट घेतली. यावेळी इंजि. बबनराव कातोरे उपस्थित होते. सप्रे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महापालिका प्रशासन, महापौर, पक्षाचे पदाधिकारी यांनी आम्हाला दुय्यम वागणूक दिली.
तसेच कोणत्याही प्रकारचा स्थानिक विकासासाठी निधी दिला नाही. वेळोवेळी पाठपुरावा करून सुद्धा उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. नागपूर- बोल्हेगावच्या रस्त्यासाठी चार-चार वेळा आंदोलन केली तरी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.
काही प्रभागात २० ते २४ कोटींची कामे खताविण्यात आली. परंतु प्रभाग ७ करीता कोणत्याही प्रकारचा निधी दिला नाही. अडीच वर्षापासून स्थानिक कामाचे इस्टिमेट महापालिका कार्यालयात असून ते खतविण्यात आले नाही.
आज प्रभागामध्ये रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था आहे. ठेकेदाराने रस्ते खोदून ठेवल्यामुळे नागरिकांना पायी चालणे सुद्धा कठीण झाले आहे. या प्रभागात लहान-मोठे अपघात झाले तरी कोणतीही दखल घेण्यात आली नाही.
पक्षाचे महापौर व पक्षाचे नगरसेविका असल्या कारणामुळे नागरिकांच्या रोशाला सामोरे जावे लागते. मागील काळात वेळोवेळी आंदोलन केली, आंदोलनादरम्यान आमच्या कुटुंबावर राजकीय देशातून गुन्हे दाखल करण्यात आले.
आमचा बूटफेक प्रकरणाशी काहीही संबंध नसताना आम्हाला बदनाम करण्यात आले. या भागातून मोठ्या प्रमाणावर कर वसुली होत असूनही आमच्या नागरिकांवर अन्याय होत असल्याने एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही पक्षाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे.