अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- महापौर पदाच्या पदासाठी शहरात रस्सीखेच व डावप्रतिडाव सुरु असताना नगरचे राजकारण चांगलेच तापले आहे.
नुकतीच शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक यांची बैठक होऊन महापौर पदाच्या निवडीबाबत वरिष्ठांचा आदेश पाळण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी दिली.
महानगर पालिकेच्या विद्यमान महापौर पदाची मुदत येत्या 30 जून रोजी संपत आहे. तत्पूर्वी नवीन महापौर पदाची निवड होणे अपेक्षित आहे. यावेळी महापौर पदाची जागा ही अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे या जागेसाठी नगर महापालिकेत दावेदार बोटावर मोजण्या इतकेच आहेत.
त्यामुळे या पदासाठी भाजप व बसपा वगळता सर्वच पक्षात इच्छुक आहेत. शिवसेनेत देखील सौ.रोहिणी संजय शेंडगे आणि सौ. रिटा भाकरे या दोन उमेदवार या पदाच्या दावेदार आहेत.
या दोन्ही उमेदवारांनी पक्षाच्या वरिष्ठांकडे उमेदवारी मागितली असून, शिवसेना नगर दक्षिणचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर हे नगर दौर्यावर आले होते. त्यांच्या उपस्थितीत हॉटेल यश ग्रॅण्ड येथे शिवसेना नगरसेवक व पदाधिकार्यांची बैठक पार पडली.
त्यात सर्वांची मते जाणून घेण्यात आली. मागील निवडणुकांचा अनुभव लक्षात घेता पालिकेत कोणत्याही परिस्थितीत शिवसेना नगरसेवकांनी आपली एकजूट ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तसेच महापौर पदाच्या निवडीबाबत शिवसेना पक्ष प्रमुख
तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सरचिटणीस अनिल देसाई, खा. संजय राऊत, मिलिंद नार्वेकर तसेच इतर पक्ष श्रेष्ठी जो आदेश देतील त्याचे काटेकोरपणे पालन केले जाईल असा निर्णय सर्वानुमते झाला. अहमदनगर महापालिकेत शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक आहेत.
त्यामुळे आता महापौर पदावर दावा केला असून, महापौर शिवसेनेचाच होणार आहे. पक्षात कोणत्याही प्रकारचे गट, तट राहिलेले नाही. मागील आठवड्यात शिवसेनेचे एक शिष्टमंडळ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले होते.
त्यावेळी महाआघाडीच्या माध्यमातून महापौर शिवसेनेचाच करू असे सुतोवाच ठाकरे यांनी केले होते. त्यामुळे आता सेनेचा महापौर होण्यास कोणताही अडसर राहिलेली नसल्याची भावना शिवसेना संपर्क प्रमुख कोरगावकर यांनी व्यक्त केली.
यावेळी प्रथम माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, मदन आढाव, माजी शहर प्रमुख संभाजी कदम, अनिल शिंदे, उपजिल्हा प्रमुख आनंद लहामगे तसेच सर्व नगरसेवक उपस्थित होते.