अहमदनगर : शिवभोजन योजनेद्वारे सध्या शहरात मंजूर असलेल्या पाच केंद्रांत ९०० थाळीचे शिवभोजन सुरू होते. दरम्यान अनेक गरजूंना थाळी संख्या पूर्ण झाल्याने माघारी जावे लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आणखी ५ केंद्रांना मंजुरी दिली होती.
या पाचही केंद्रांना जिल्हाधिकारी यांनी कार्यारंभ आदेश दिल्यानंतर काल रविवारपासून शहरात ऐकून दहा केंद्रांत १ हजार ४०० थाळीचे शिवभोजन सुरू झाले. रविवारी प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते नव्याने मंजूर असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालया नजीक असलेल्या रेव्हेन्यू कॅंटीन येथील शिवभोजन केंद्राचे उद्घाटन झाले.
यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी, पुरवठा निरीक्षण अधिकारी विजय उमाप, अभिजित वांढेकर तसेच रेव्हेन्यू सोसायटीचे पदाधिकारी आणि पुरवठा विभागातील कर्मचारी उपस्थित होते. मुख्यमंत्रीपदी आरूढ होताच उध्दव ठाकरे यांनी राज्यातील गरीब गरजूंना दहा रुपये नाममात्र दरात शिवभोजन देण्याची घोषणा केली. एक जानेवारी रोजी योजनेचा रीतसर शासन निर्णय जारी झाला.
त्यानंतर नगर जिल्हा प्रशासनाने आघाडी घेत जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने शहरात ५ शिवभोजन केंद्रांना मंजुरी दिली. जिल्हाधिकारी व्दिवेदी यांच्या दिशानिर्देशात पुरवठा विभागा मार्फत योजनेची अंमलबजावणी सुरु आहे.
जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी व पुरवठा विभागातील कर्मचारी वर्गाचे पथक योजनेच्या काटोकोर अंमलबजावणी मध्ये व्यस्त आहे. शिवभोजनाच्या पथदर्शी कामासाठी पुरवठा विभागाचे केंद्र चालकांना सूचना व मार्गदर्शन निरंतर सुरु आहे. गरजू लाभाथ्र्याला निश्चित करण्यात आलेले शिवभोजन मिळावे यासाठी केंद्रांची पुरवठा विभागाच्या वतीने नियमित तपासणी सुरु आहे.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते योजनेचे उद्घाटन झाले. या योजनेचा लाभ घेणारे अनेक गरजवंत लाभार्थी शिवभोजनाबद्दल सरकारला मन:पूर्वक धन्यवाद देत आहेत. मात्र, अनेक गरजूंना माघारी जावे लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन वाढीव सातशे थाळी संख्येचा प्रस्ताव जिल्हाधिकारी व्दिवेदीच्या निर्देशात तयार करण्यात आला.
सक्षमपणे सेवा देऊ शकतील अशा नव्या केंद्रांचा शोध घेण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी व्दिवेदीच्या अध्यक्षतेखालील समितीने आणखी पाच केंद्रांना नव्याने मंजुरी दिली. त्यामुळे शिवभोजन केंद्रांची ऐकून संख्या दहा झाली आहे.