धक्कादायक! प्रेमप्रकरणातून तरुणीला जीवे मारण्याचा प्रयत्न

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :-  एकतर्फी प्रेमातून तरूणाने तरूणीचा गळा आवळल्याची धक्कादायक घटना गुरूवारी पहाटे पावणेसहा वाजण्याच्या सुमारास पारनेर तालुक्यातील म्हसणे फाटा औदयोगिक वसाहत परिसरात घडली.

गळा आवळल्यामुळे बेशुद्ध झालेल्या तरूणीस सुपा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात तरुण प्रविण भिमाजी गवळी (रा. राजापूर मठ ता. श्रीगोंदा) यांच्याविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, घटना घडल्यानंतर पीडित तरुणीला ती काम करत असलेल्या कंपनीच्या व्यवस्थापनाने उपचारासाठी नेण्यासाठी केलेल्या टाळाटाळीमुळे कामगार वर्गामधून चिड व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेबाबत अधिक माहिती अशी कि, पीडित तरुणी ही म्हसणे फाटा येथे असलेल्या एका कंपनीमध्ये कामाला आहे.

तिच्या गावा शेजारचा एक तरुण तिच्याच कंपनीमध्ये नोकरीस आहे. तो तिच्याकडे नेहमीच प्रेमाची भावना व्यक्त करीत होता. मात्र, तरुणीकडून प्रतिसाद मिळत नव्हता. तुला माझ्याशी लग्न करावे लागेल, नाही केले तर तुझ्या घरच्यांसह तुझ्या होणार्‍या नवर्‍यालाही मारून टाकेल, अशी धमकी संबंधित गवळी देत होता.

दरम्यान, गुरूवारी पहाटे पीडित तरुणी कंपनीमध्ये जाण्यासाठी निघाली असता तरुणाने तिला पहाटेच वाटेत अडविले. तिचा मोबाईल घेऊन त्याचे पॅटर्न लॉकही त्याने उघडून घेतले. त्यानंतर पाठीमागून तिचा गळा आवळला. ती बेशुद्ध अवस्थेत गेल्यानंतर त्याने तिला वेड्या बाभळीच्या फासामध्ये फेकून दिले.

त्यानंतर ती अत्यावस्थेत सापडली असून खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कोसे यांनी तरुणीचा जबाब नोंदविला असून संबंधित तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पसार असून त्याच्या शोधासाठी पथके रवाना केली असल्याचे उपनिरीक्षक कोसे यांनी सांगितले.

अहमदनगर लाईव्ह 24