अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :- महानगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आनंद लॉन्स येथे येथील कोविड सेंटरमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे इतर तीन विभागाचा अतिरिक्त कारभार पाहणाऱ्या डॉ. नलिनी थोरात यांच्याकडेच सध्या येथील कोविड सेंटरचा वैद्यकीय अधिकारी पदाचा कारभार आहे.
त्यामुळे इतर सर्व कामे सांभाळून येथे राऊंड साठी येताना दररोज त्यांना मोठी कसरत करावी लागते. २ जुलै रोजी पाईपलाईन रोड वरील सिटी लॉन्स मागील बाजूस असलेल्या आनंद लॉन्स मध्ये कोविड सेंटर सुरू करण्यात आले.
त्यावेळी येथे डॉ. प्रविण डुंगरवाल (फिजिशियन) डॉक्टर दिलीप बागल (बालरोगतज्ज्ञ) व डॉ.नलिनी थोरात (वैद्यकीय अधिकारी) या तिघांची नेमणूक करण्यात आली होती.परंतु डॉ. प्रवीण डुंगरवाल हे २ जुलैपासून फक्त एक आठवडाभर आनंद लॉन्स ला राऊंड साठी येत होते. तेव्हापासून १० सप्टेंबरपर्यंत ते आनंद लॉन्स ला फिरकलेले नाहीत.
तर डॉ. दिलीप बागल हे २४ ऑगस्ट पासून येथे आलेले नाहीत. त्यामुळे डॉ. नलिनी थोरात या एकट्याच कोविड सेंटरचे कामकाज पाहतात. त्यांच्याकडे शहर क्षयरोग अधिकारी, लसीकरण अधिकारी, व आरसीएच ऑफिसर अशा तीन विभागाचा अतिरिक्त कारभार आहे. त्यामुळे त्यांना तेही काम करावे लागते.
त्यांच्या अनुपस्थितीत इथला कारभार रामभरोसे चालतो. आनंदलॉन्स मध्ये एकूण १०० बेडची व्यवस्था असून सध्या ७५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. त्यासाठी येथे सकाळ दुपार संध्याकाळ अशा तीन शिफ्टमध्ये मनपा कर्मचार्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
त्यामध्ये ८ नर्सेस, १ फार्मसिस्ट, २ सफाई कामगार, ६ शिपाई, १कम्पाउंडर, १ॲम्बुलन्स व १ ड्रायव्हर असा कर्मचारी वर्ग आहे. कामचुकार कर्मचारी सफाई कर्मचारी पुरेशा प्रमाणात तैनात केलेले असले तरी येथील खोल्यांमधून दररोज झाडलोट, फरशी पुसणे अशी साफसफाई केली जात नाही.
त्यामुळे रुग्णांना स्वतःलाच झाडू मारावा लागतो कचरा गोळा करून बकेटमध्ये टाकावा लागतो व कचऱ्याची बकेट खाली नेऊन द्यावी लागते. इथे ड्युटीवर असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना पी पी ई किट, हॅन्ड ग्लोज, मास्क, सॅनिटायझर देण्यात येते. मग या कर्मचाऱ्यांनी रूम मध्ये येऊन सर्व सेवा द्यायला काय हरकत आहे ?
असा प्रश्न उपस्थित होतो. वैद्यकीय अधिकाऱ्यांची अनुपस्थितीती, कामचुकार कर्मचारी, सोयीसुविधांचा अभाव असल्याने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. प्रशासनाने तसेच लोकप्रतिनिधीने याकडे लक्ष दिले तर याअडचणी तात्काळ सुटू शकतात..
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved