अहमदनगर Live24 ,14 जून 2020 : आपण पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी असल्याचे सांगत कर्जत पोलिसांसह अन्य सरकारी अधिकाऱ्यांचा शाही पाहुणचार झोडणाऱ्या कर्जत तालुक्यातील राशीन येथील योगेंद्र उपेंद्र सांगळे या ‘तोतया’स अटक केली असून, त्याला कोर्टाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
यावेळी चौकशी दरम्यान तो कोणी अधिकरी नसून अट्टल गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. त्याच्याविरूद्ध मध्यप्रदेशात एका युवतीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली आहे.
आता पोलीस त्याची कसून चौकशी करत असून, त्यातून एकेक कारनामा उघड होत आहे . कर्जतला येण्याआधी त्याने २०१८ मध्ये मध्यप्रदेशमधील एका युवतीशी प्रेमाचे खोटे नाटक करून त्या मुलीशी प्रेमसंबंध निर्माण केले. त्यासाठी तो मध्यप्रदेशात तिच्यासोबत हॉटेलमध्ये, लॉजवर राहिला.
तिला अनेक ठिकाणी फिरायला घेऊन गेला. एका मंदिरात दर्शनासाठी रांग सोडून प्रवेश मिळविण्यासाठी त्याने आपण व्हीआयपी असल्याची बतावणी केली. मात्र, तेथील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला अडविले.
पोलिसांनी वरिष्ठांकडे चौकशी केल्यावर त्याचे पितळ उघड पडले.त्या युवतीसमोरच हा प्रकार उघड झाल्यावर आपलीही फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले. मग तिनेही फसवणूक आणि बलात्कार केल्याची फिर्याद दिली.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. तेथून जामिनावर सुटल्यावर तो राशीनला आला. इकडे आल्यावर पु्न्हा तोतयेगिरी सुरू केली. केवळ पोलिसच नव्हे तर अन्य सरकारी विभागांनाही त्याने फसविल्याचे पोलिसांच्या चौकशीत आता पुढे येत आहे.
पोलिसांचा वापर करून सवलती मिळविल्या आहेत. कर्जतच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयात त्याची नेहमी उठबस होत असे. अधिकाऱ्यांच्या सरकारी वाहनातून तो फिरत असे.
कर्जत पोलीस ठाण्यात दाखल तोतयेगिरीच्या गुन्ह्यात सध्या तो पोलीस कोठडीत आहे. त्याच्याकडून आणखी काही कारनामे उघड होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews