अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 : प्रतिष्ठित डॉक्टर म्हणून मिरवणाऱ्या डाॅ. शंकरप्रसाद दिगंबर गंधे याने अवघ्या ४५ हजारांसाठी भ्रूणहत्या केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.
पोलिसांच्या चौकशीत आणखी धक्कादायक माहिती समोर आली असून आपला बळजबरीने गर्भपात केला असल्याचा जबाब पीडित महिलेने नगर तालुका पोलिसांना दिला आहे.
संबंधित महिलेला गर्भपातासाठी ऑपरेशन थिएटरपर्यंत घेऊन जाणारे नेमके कोण होते याचा उलगडा मात्र अजून झालेला नाही. नगर तालुक्यातील जखणगाव येथील गंधे हॉस्पिटलमध्ये दोन दिवसांपूर्वी एका महिलेचा गर्भपात करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार व त्यांच्या पथकाने छापा टाकून गर्भपात करणारा डॉ. गंधे याला अटक केली. ज्या महिलेचा गर्भपात केला, ती मूळची आळेफाटा येथील आहे.
काही दिवसांपासून ती जखणगाव येथे माहेरी आली होती. आर्थिक परिस्थिती जेमतेम असलेल्या या महिलेचा पती ट्रक ड्रायव्हर आहे. आधीच्या तीन मुलींनंतर तिला गर्भ राहिला,
पण तोदेखील मुलीचा निघाल्याने तिच्यावर बळजबरीने गर्भपात करण्याची वेळ आली. तीन महिन्यांपेक्षा अधिक दिवस झालेले असतानाही डॉ. गंधे याने बेकायदेशीर गर्भपात केला.
त्यासाठी तब्बल ४५ हजार रुपयांची मागणी त्याने केली होती. त्यापैकी २५ हजार रुपये गंधे याने गर्भपात करण्याच्या आधीच संबंधितांकडून घेतल्याची माहिती पोलिस तपासात समोर येत आहे.
डॉ. गंधे याच्याविरोधात नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews