अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :- चोरीच्या व गळ्यातील दागिने लुटण्याच्या उद्देशाने अज्ञात चोरट्याने एका 80 वर्षे वयाच्या वृद्धेचा गळा दाबून खून केला. सावित्राबाई मोगल शेळके असे या खून झालेल्या वृद्धेचे नाव आहे.
दरम्यान संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर गावात भरदिवसा हा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे एकाच खळबळ उडाली होती. याबाबत अधिक माहिती अशी कि, कौठेकमळेश्वर गावात सावित्राबाई ही वृद्धा राहत होती.
ती मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास घरात एकटीच असताना अज्ञात चोरट्याने तिच्या घरात प्रवेश केला. चोरीच्या उद्देशाने अज्ञात चोरट्याने सदर वृद्धेचा गळा दाबून खून केला.
दरम्यान नजीकच राहणारी एक पाच वर्षाची बालिका गोळ्या घेण्यासाठी त्या ठिकाणी आली असता तिने सदर प्रकार बघितला. त्यानंतर चोरट्याने सदर बालिकेच्या कानातील सोन्याचे दागिने ओरबडले.
जखमी झालेली व घाबरलेली मुलगी त्यानंतर आजी – आजी म्हणत तिच्या नजीकच्या घराकडे पळाली तोपर्यंत अज्ञात चोरटा पसार झाला होता. नजीकच्या रहिवाशांनी सदर वृद्धेच्या घराकडे धाव घेतल्यावर संपूर्ण प्रकार उघड झाला.
स्थानिक रहिवाशांनी पोलिसांना कळविले. त्यानंतर संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी पोलीस फौजफाटा घेवून घटनास्थळी धाव घेतली.
पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे. चोरटा एक होता की एकापेक्षा अधिक याचा शोध पोलीस घेत आहेत.