श्रीगोंदा :- राज्य साखर संघाचे दिवंगत अध्यक्ष माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांच्या जयंतीदिनानिमित्त नागवडे कारखाना कार्यस्थळावर शनिवारी (१९ जानेवारी) अभिवादन सभा व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष केशवराव मगर यांनी गुरुवारी दिली.
राज्य साखर संघाचे दिवगंत अध्यक्ष व नागवडे कारखान्याचे संस्थापक, माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांचा १९ जानेवारी हा जन्मदिवस. त्यांचा वाढदिवस तालुक्यात विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा केला जात होता.
नागवडे यांचे १९ सप्टेंबर २०१८ रोजी निधन झाले. यावर्षी त्यांच्या जन्मदिवसानिमित्त शनिवारी सकाळी १० वाजता नागवडे कारखाना कार्यस्थळावर अभिवादन सभेचे आयोजन केले आहे. बापूंच्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ साहित्यिक व कादंबरीकार प्रा. व. बा. बोधे यांचे ‘जीवन त्यांना कळला हो’ या विषयावरील व्याख्यान होणार आहे.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस यांचे अध्यक्षतेखाली होणाऱ्या अभिवादन सभेला ‘कुकडी’चे अध्यक्ष आमदार राहुल जगताप, नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, सभापती अनुराधा नागवडे, काँग्रेसचे अध्यक्ष अण्णासाहेब शेलार, भगवानराव पाचपुते, नगराध्यक्ष मनोहर पोटे, धनसिंग भोईटे, अर्चना गोरे, सोपानराव थिटे, बाळासाहेब गिरमकर आदी उपस्थित राहणार आहेत.