श्रीरामपूर :- नगरपालिका निवडणूक प्रक्रियेत नगरसेवक पदासाठी भरण्यात आलेल्या नामनिर्देशन पत्रासोबत सादर केलेल्या शपथपत्रात खोटी माहिती व वार्षिक उत्पन्नाचा तपशिल निरंक दाखवून निवडणूक निर्णय अधिकार्यांची दिशाभूल केली. या कारणावरून राष्ट्रवादीचे नगरसेवक राजेंद्र जगन्नाथ पवार यांच्याविरुध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
नगरसेवक राजेंद्र पवार यांच्या विरोधात निवडणूक लढविणारे काँग्रेसचे पराभूत उमेदवार संजय जगन्नाथ छल्लारे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार दाखल केली होती. उमेदवारी अर्ज दाखल करताना श्री. पवार यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याविरूध्द दाखल असलेल्या कलम 138 च्या केसेस बाबतची माहिती दडवून ठेवली आहे. दोन वर्षापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या कलमान्वये गुन्हा दाखल असेल तर तो प्रतिज्ञापत्रात नमूद करणे गरजेचे आहे.
मात्र पवार यांनी ही माहिती दडवून ठेवल्याचे छल्लारे यांनी तक्रारीत म्हटले होते. दरम्यान, निवडणूक आयोगाने या तक्रारीची दखल घेत कारवाईचे आदेश दि. 21 मे 2018 रोजी जिल्हाधिकार्यांना दिले होते. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हाधिकार्यांनी या तक्रारीची चौकशी व सुनावणी करण्यासाठी श्रीरामपूर प्रांताधिकारी यांची नेमणूक केली होती.
चौकशीनंतर प्रांताधिकार्यांनी आपला अहवाल दि. 1 ऑक्टोबर 2018 रोजी जिल्हाधिकार्यांना सादर केला होता. या अहवालाचे अवलोकन केल्यानंतर नगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना राजेंद्र पवार यांनी खोटे शपथपत्र सादर केल्याचे समोर आले. त्यामुळे उपजिल्हाधिकारी संदीप आहेर यांनी श्रीरामपूर प्रांताधिकारी यांना लेखी आदेशाद्वारे राजेंद्र पवार यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊन याबाबत अहवाल सादर करण्याचे कळविले होते.
त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. 2016 च्या नगरपालिका निवडणुकीनंतर संजय छल्लारे यांनी तक्रार दाखल करुन सलग दोन वर्ष पाठपुरावा केला. त्यांच्या या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात ज्योती छबुराव गुंजाळ ( नायब तहसीलदार, श्रीरामपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.