अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब, फत्याबाद, कुरणपूर, उक्कलगाव, पिंपळगाव शिवारात नरभक्षक बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून त्याला जेरबंद करण्यात वन विभागाला अद्याप यश आलेले नाही. दोन बालकांचा बळी घेत कित्येक पाळीव प्राण्यांचा फडशाही त्याने पाडला आहे.
गणेशोत्सवात कडीत येथील दर्शन देठे हा मुलगा आरती करून चुलतीबरोबर घरी येत असताना उसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला होता. त्यात दर्शनचा मृत्यू झाला होता.
दोन दिवसांपूर्वी गळनिंब येथे बिबट्याने ज्ञानेश्वरी मारकड या तीन वर्षांच्या चिमुकलीवर हल्ला करून ठार केले. सोमवारी पिंपळगाव फुणगी येथे श्रेया मंजाबापू जाधव तीन वर्षांच्या चिमुकलीला बिबट्याने जखमी केले. मंगळवारी सकाळी उक्कलगाव येथे आदिनाथ जगधने यांच्या वस्तीवरील एका कुत्र्याला बिबट्याने भक्ष्य बनवले.
कोपरगाव वनविभागात कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता हे तालुके येतात. कार्यक्षेत्र मोठे असताना केवळ तीन-चार कर्मचारी कार्यरत आहेत. मागील वर्षी या तीन तालुक्यांत १५० हून अधिक बिबटे आढळले. मागील वर्षी ७ माद्या प्रसूत झाल्या. प्रत्येकी तीन बछडे पकडले, तरी २१ बिबटे वाढले आहेत.
बिबट्यांना पकडण्यासाठी वनक्षेत्रात एकूण २० पिंजरे आहेत. नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी दोन वाहनांसह आठ ते दहा कर्मचारी तैनात आहेत. कुरणपूर, गळनिंब, कडीत बुद्रूक, कडीत खुर्द, उक्कलगाव, फत्याबद, पिंपळगाव फुणगी या भागात दहा पिंजरे लावण्यात आले आहेत. मात्र, अद्यापही हा नरभक्षक बिबट्या वनविभागाच्या तावडीत सापडत नसल्याने कर्मचारी हताश झाले आहेत.
पकडलेल्या बिबट्याला लांब जंगलात नेऊन सोडले जाते. मात्र, तेच बिबटे पुन्हा मानवी वस्तीकडे येतात. त्यांना यापूर्वी पिंजऱ्याचा अनुभव आलेला असतो. त्यामुळे ते पिंजऱ्याला हुलकावणी देत असेल, तर नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी अन्य पर्याय वापरावे लागणार आहेत.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com