अहमदनगर Live24 , 29 एप्रिल 2020 :- एमआयडीसी’तील काही कारखान्यांची गेल्या दीड महिन्यापासून बंद असलेली फाटकं उघडली गेली आहेत. प्रत्यक्ष उत्पादन नसले, तरी मेंटेनन्स व पेंडिंग कामे केली जात आहेत.
कामकाज सुरू झालेल्या कंपन्यांमध्ये इंडियन सिमलेस, लार्सन अॅड टुब्रो, कमिन्स अशा मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे.
20 एप्रिलनंतर लॉकडाऊनचे बंधन काही प्रमाणात शिथिल करण्यात आल्यानंतर महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्राबाहेरील कंपन्या सुरू करण्यास काही अंशी परवानगी ‘एमआयडीसी’तील कंपन्यांना दिली होती.
छोट्या कंपन्यांनी तर ‘एमआयडीसी’च्या जवळ राहणारे व पायी कारखान्यात येऊ शकतील, अशा पाच-दहा कामगारांवरच काम सुरू केले आहे. यामध्ये प्राधान्याने मेंटेनन्स, मार्केटिंग विभागाचे कर्मचारी आहेत. प्रत्यक्ष उत्पादन सुरू करण्यास आणखी बर्याच अडचणी आहेत.
बहुतांश माल बाहेरून येणारा असल्याने तो पुरेशाप्रमाणात सुरू झाल्याशिवाय आणि त्या प्रमाणात नवीन ऑर्डर मिळाल्याशिवाय काम पूर्ण क्षमतेने सुरू होणे सध्या तरी शक्य नसल्याचे उद्योजकांकडून सांगण्यात आले.
कंपनी सुरू केल्यानंतर विविध कारणांसाठी वेगवेगळ्या वस्तुंची गरज पडत असते. ती सध्या मिळणे अशक्य आहे. तसेच पुणे, औरंगाबाद, मुंबई या ठिकाणांहून माल येत असतो. तो येण्यातही अनेक अडचणी आहेत.
हे सर्व सुरळीत झाले तरच कंपनीची कामे पूर्ववत होतील. 3 मे नंतर हे सुरळीत न झाल्यास सध्या सुरू केलेल्या कंपन्या पुढे चालू ठेवणे अशक्य होणार असल्याने त्या बंद कराव्या लागतील, अशी भीती काही उद्योजकांनी व्यक्त केली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®