अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :- शेतीसाठी सोमवारपर्यंत पुरेशा दाबाने वीज मिळाली नाही, तर काळेवाडी येथे सामूहिक गळफास लावून घेऊ, असा इशारा पाथर्डी तालुक्यातील बहिरवाडी, हाकेवाडी, रुपनरवाडी व काळेवाडी येथील शेतकऱ्यांनी महावितरणच्या पाथर्डी कार्यालयास दिला आहे.
महावितरणचे उपअभियंता नीलेश मोरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बिबट्याच्या दहशतीमुळे दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी केली होती. त्यामुळे एकावेळी सर्वच विद्युत पंप सुरू होत असल्याने पुरेशा दाबाने वीजपुरवठा होत नाही.
त्यामुळे रब्बीची पिके जळू लागली आहेत. पावसामुळे हातातोंडाशी आलेली खरिपाची पिके नष्ट झाल्याने अगोदरच शेतकरी हतबल झाला आहे. येत्या सोमवारपर्यंत रात्री का होईना परंतु पुरेशा दाबाने वीजपुरवठा सुरू झाला नाही, तर सामूहिक गळफास घेण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदनावर मोहोज देवढेचे माजी सरपंच गणेश चितळकर, ग्रामपंचायत सदस्य कैलास नरोटे, मोहोज देवढे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन शिवाजी नरोटे, शहादेव नरोटे, जनार्धन रूपनर, भाऊराव रुपनर, विकास दिंडे आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.