अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :- कोरोनाग्रस्त रुग्णांकडून ज्या रुग्णालयांनी जास्तीचे बिल आकारले आहे. अशांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
मात्र आता त्यांच्याकडून रुग्णांना द्यावयाची असलेली रक्कमेची वसुली व आदेशाचे पालन केले नाही, म्हणून त्यांचे हॉस्पिटल रजिस्ट्रेशन रद्द का करू नये.
यावर त्यांना पुन्हा नोटिसा बजावून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल व त्यानंतरच पुढील कारवाई होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
जिल्हाधिकारी म्हणाले की, कोरोना कालावधीमध्ये राज्य शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसार आकारणी करणे महत्त्वाचे होते. नगर शहरामध्ये १७ रुग्णालयाचे ऑडिट केल्यानंतर १०९९ बिलांमध्ये त्रुटी आढळून आल्या.
त्याची पुढील तपासणी केल्यावर ९०२ बिलामध्ये त्रुटी आल्यामुळे संबंधित १४ रुग्णालयांना नोटिसा बजावून त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला होता. काहींनी खुलासा केला होता,
काहींचा खुलासा आलेला नाही. जर नियमांचे उल्लंघन केले तर त्याला वैद्यकीय क्षेत्रातील मुंबई नर्सिंग होम ऍक्ट, साथरोग प्रतिबंधक कायदा व अत्यावश्यक सेवा कायदा या तीन प्रकारच्या कायद्यानुसारच प्रक्रिया करावी लागते.
जर त्या रुग्णालयांना नोटिसा देऊन त्यांनी पैसे भरलेले नसतील व त्यांचे वैद्यकीय लायसन रद्द करायचे असेल, तर कायद्यानुसार प्रक्रिया करावी लागते.