सोशल मीडिया वाढवितोय किशोरवयीन मुलांमध्ये नैराश्य !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

लंडन : कोणत्याही गोष्टीचा अतिरेक आयुष्यात नुकसानकारक ठरते. सध्याच्या आधुनिक काळात सोशल मीडिया, संगणक आणि टीव्हीने लोकांचे जीवन अतिशय सुलभ केले आहे. दुसरीकडे त्यांचा जास्त प्रमाणातील वापर आजारांना आमंत्रण देणारा ठरत आहे.

एका अध्ययनात शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की, चार वर्षांच्या कालावधीत सोशल मीडिया, टीव्ही आणि संगणकाचा अति वापर केल्यामुळे नैराश्य आणि चिंतेची लक्षणे जास्त गंभीर होण्याचा धोका वाढू शकतो.

जर्नल ऑफ सायकेट्रीमध्ये प्रकाशित झालेल्या या अध्ययनात असे दिसून आले की, सोशल मीडिया, संगणक आणि टीव्ही पाहण्याच्या सरासरी प्रवृत्तीपेक्षा जास्त प्रवृत्तीच्या संपर्कात आल्यामुळे चिंता आणि नैराश्याची लक्षणे दिसू लागतात.

कॅॅनडातील मॉन्टियल युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, किशोरवयीन मुले सोशल मीडियाचा वापर कमी करतात, तेव्हा त्यांच्यात नैराश्याची लक्षणेही कमी दिसून येतात. या अध्ययनातून एक महत्त्वाच्या गोष्टीचा खुलासा झाला आहे, तो म्हणजे सोशल मीडियाचा वापर व टीव्ही पाहणे केवळ नैराश्यच वाढते.

संगणकाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास त्याचा संबंध नैराश्याशी नाही तर चिंतेशी असल्योच शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले.

तरुण आणि त्यांच्या कुटुंबाने नैराश्य व चिंता वाढणार नाही यासाठी डिजिटल स्क्रीनसमोर कशाप्रकारे व किती वेळ घालविला पाहिजे, त्याबाबत हे अध्ययन सांगते. स्क्रीनवर जास्त वेळ डोळे खिळवून राहणे भविष्यात नैराश्य व चिंताग्रस्त होण्याचे लक्षण आहे.

अहमदनगर लाईव्ह 24