नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण ब्यूरो अर्थात सीबीआयने इंटरनेटवरील बालकांशी संबंधित वाढत्या पोर्न साहित्याला रोखण्यासाठी विशेष तुकडीची स्थापना केली आहे.
इंटरनेटवर अशा प्रकारच्या साहित्याला चालना देणाऱ्यांवर विविध कलमांअंतर्गत गुन्हे दाखल केले जाणार आहेत. सीबीआयने आपल्या मुख्यालयातच ऑनलाइन बाललैंगिक अत्याचार व शोषण प्रतिबंध व अन्वेषण विभाग सुरू केला आहे.
विभागामार्फत बालकांशी संबंधित पोर्नवर करडी नजर ठेवली जाणार आहे. इंटरनेटवर अशा साहित्याचा फैलाव करणाऱ्यांबरोबर जे लोक हे डाऊनलोड करतात, त्यांचीही माहिती गोळा केली जाणार आहे.
संबंधित गुन्हेगारांवर भारतीय दंड संहिता, बाललैंगिक गुन्हेगार संरक्षण कायदा (पॉक्सो) आणि माहिती-तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला जाणार आहे.