अहमदनगर – शालेय क्रीडा स्पर्धेवर क्रीडा शिक्षक व क्रीडा संघटनांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांच्या मनमानी कारभाराला व हुकूमशाहीला विरोध करून टाकलेल्या बहिष्काराच्या संदर्भात योग्य ती कार्यवाही व्हावी म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राम शिंदे यांची भेट घेऊन निवेदन दिले.
यावेळी पालकंत्री शिंदे यांनी कुठल्याही खेळाडूचे नुकसान होऊ देणार नाही. यासंदर्भात आजच तातडीने शिक्षण मंत्र्यांशी बोलून योग्य ती कार्यवाही करण्यासंदर्भात आश्वासन शिष्टमंडळास दिले.
पालकमंत्री यांना भेटावयास गेलेल्या शिष्टमंडळाने शालेय स्पर्धेसाठी कपात केलेला निधी, अग्रीम रक्कम देण्यास दिलेला नकार, संघटनांची काढून घेतलेली कार्यालये, जलतरण मध्ये असलेली भागीदारी, क्रीडा संकुलातील प्रवेश शुल्क, क्रीडा संकुलातून कमी झालेले खेळाडू, क्रीडा संकुलातील महादेव मंदिर हटविण्या संदर्भातील अधिकार्यांची विकासक धार्जिनी भूमिका व क्रीडा कार्यालयातील कर्मचार्यांनी क्रीडा अधिकारी यांच्याविरोधात पुकारलेला असहकार व सामूहिक रजा प्रकरण या बाबींची माहिती पालकमंत्र्यांना करून दिली.
तसेच लोकप्रतिनिधी यांच्याबाबत वापरण्यात येणारी एकेरीची भाषा या संदर्भात पालकमंत्र्यांना अवगत करण्यात आले. अहमदनगर जिल्ह्यातील असलेली क्रीडा प्रबोधिनी अहमदनगर जिल्ह्यातून रद्द करून नाशिक जिल्ह्यात पाठविण्यास पुढाकार घेणार्या जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या तक्रारीचा पाढा पालकमंत्र्यांसमोर शिष्टमंडळाने वाचला.
शालेय क्रीडा स्पर्धा ठप्प असून अद्याप एकाही तालुक्याच्या स्पर्धा सुरु झाल्या नसून, क्रीडा स्पर्धेवर असहकारामुळे संकट निर्माण झाले असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी शिक्षण मंत्र्यांशी बोलून त्वरेने कार्यवाही करण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.
या शिष्टमंडळात शिवछत्रपती पुरस्कारार्थी सुनील जाधव, राज्य क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर, माध्यमिक शिक्षक संघटनेचे सचिव आप्पासाहेब शिंदे, शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे, महासंघाचे राज्य कोषाध्यक्ष घनश्याम सानप, अॅथलेटिक्स असो. ऑफ महाराष्ट्रचे सहसचिव दिनेश भालेराव, क्रीडा शिक्षक अरविंद आचार्य, नंदकुमार शितोळे, तालुका अध्यक्ष महेंद्र हिंगे, पोपटराव लोंढे व मंदिर बचाव कृती समितीचे सतीश सायंबर इत्यादी उपस्थित होते.