Ahmadnagar Breaking : शाळेचे गेट अंगावर पडल्याने पांडुरंग बाळु सद्गीर (रा. मुथाळणे, ता. अकोले) या दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी समशेरपूर येथील अगस्ती विद्यालयात शाळा उघडताना ही घटना घडली. या घटनेत आणखी एक विद्यार्थी जखमी झाला आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी, शनिवारी सकाळची शाळा असल्याने समशेरपूर येथील शाळेत परिसरातील अनेक विद्यार्थी बसने येतात. बस लवकर आल्याने अनेक विद्यार्थी शाळेच्या वेळेआधी शाळेच्या प्रांगणात जमतात.
काल सकाळी मुथाळणे येथील पांडुरंग सदगीर हा विद्यार्थीदेखील शाळेत आला होता. शाळा सुरू होण्याची वेळ झाल्यावर गेट उघडण्यासाठी काही मुले पुढे गेले. तेव्हा पांडुरंग यांच्या अंगावर गेट पडले.
गेटचे वजन जास्त असल्याने पांडुरंग जखमी झाला.घटना घडल्यामुळे विद्यार्थी घाबरले. त्यांनी ही घटना शिक्षकांना सांगितली. शिक्षक व विद्यार्थ्यांनी मिळून गेट बाजूला केले; परंतु तोपर्यंत डोक्याला मार लागल्याने अंतर्गत रक्तस्त्राव होऊन पांडुरंग गंभीर जखमी झाला होता.
त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेत बबलू सदगीर हा दुसरा विद्यार्थी जखमी झाला आहे. घटनेची खबर मिळताच परिसरातील पालकांनी शाळेत गर्दी केली.
विद्यार्थ्यांची सुरक्षा व मयत विद्यार्थ्याला वेळेत उपचार मिळाले नाही, म्हणून पालकांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.