विहिरीत पडलेल्या बिबट्यास बाहेर काढण्यात यश

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

शिर्डी : शिर्डीपासून दोन किमी अंतरावर असलेल्या बिरोबा बनातील एका विहिरीत पडलेल्या बिबट्यास काढण्यात वनविभागास अखेर यश आले. बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने या भागातील रहिवाशी तसेच शेतकरी वर्गाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

शिकारीच्या शोधात असलेला बिबट्या शिर्डीपासून जवळच असलेल्या बिरोबा बनातील शेतकरी संजय माधव कोते यांच्या विहिरीत पडला होता. गुरुवारी (दि. १२) सकाळी सात वाजेच्या सुमारास ते शेतातील विहिरीजवळ गेले असता त्यांना विहिरीतून आवाज येत असल्याचे ऐकू आले.

त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता त्यांच्या विहिरीत रात्रीच्या वेळी शिकारीच्या शोधात असलेला बिबट्या विहिरीत पडल्याचे दिसून आले. याबाबतची माहिती त्यांनी जवळपासचे रहिवाशी व शेतकऱ्यांना सांगताच मोठ्या प्रमाणात लोकांनी बिबट्या पाहण्यासाठी गर्दी केली होती.

विहिरीत असलेल्या फळीवर बिबट्या बसला होता. सामाजिक कार्यकर्ते योगेश काटकर यांनी कोपरगाव येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली. सकाळी ११ वाजेनंतर कोपरगाव वनविभागाचे उपविभागीय अधिकारी बी. एस. गाढे, जी. बी. सुरासे, थोरात आदींसह घटनास्थळी पिंजरा घेऊन आले.

विहिरीच्या सभोवताली मोठ्या प्रमाणात झाडेझुडुपे असल्याने प्रथम नागरिकांच्या मदतीने येथील साफसफाई करण्यात आली. त्यानंतर पिंजऱ्यास चारही बाजूने दोर बांधून विहिरीत सोडण्यात आला.

दीड-दोन तासाच्या प्रयत्नानंतर बिबट्या पिंजऱ्यात जाताच त्यास विहिरीतून बाहेर काढण्यात यश आल्याने या भागात राहणारे रहिवाशी तसेच शेतकरी वर्गाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24