अहमदनगर Live24 टीम,13 जुलै 2020 : करोनाची लागण झाल्याने आम्ही पती-पत्नी हॉस्टिलमध्ये राहून त्याच्याशी संघर्ष करतो आहोत. तुम्हीही बाहेर नियम पाळून करोनाशी संघर्ष करा.
तज्ज्ञांचा सल्ला आणि शास्त्रीय पद्धतीने मुकाबला केल्याशिवाय हे संकट हटणार नाही. मात्र अशी दुर्दैवी वेळ कुणावरही येऊ नये’ अशी अपेक्षा करत श्रीरामपूरचे काँग्रेसचे आमदार लहू कानडे हे भावुक झाले आहेत.
आ. कानडे यांना करोनाची लागण झाल्यानं त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सुधारली असून त्यांना लवकरच घरी सोडण्यात येणार आहे.
सेवानिवृत्त सरकारी अधिकारी आणि साहित्यिक असलेल्या कानडे यांनी रुग्णालयातून एका व्हिडिओद्वारे हा संदेश दिला आहे.
मतदारसंघात काम करत असताना एका बैठकीदरम्यान बाधित अधिकाऱ्याच्या संपर्कात आल्याने त्यांनाकरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात येते.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर शासनाचे नियम पाळण्याचं आवाहन आमदार कानडे यांनी केलंय. जिल्हा परिषदेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी असताना कानडे यांनी राज्याला ‘हागणदारीमुक्ती’ नावाने स्वच्छतेची मोहिम दिली होती.
त्याचे रुपांतर पुढे स्वच्छतेच्या विविध चळवळींमध्ये झालं आहे. त्यामुळं दवाखान्यात असतानाही त्यांनी करोनावर मात करण्यासाठी स्वच्छताही तेवढीच महत्वाची असल्याकडं लक्ष वेधलं आहे.
करोनानं जगभरातील मानवी जीवनच कठीण करून टाकलं आहे. हे संकट लवकर आणि सहज संपणारे नाही. त्यामुळं आपल्याला आता त्याच्यासोबत जगण्याची सवय लावून घ्यावी लागेल.
त्यासाठी करोना हा आजार शास्त्रीयदृष्टया समजावून घ्यावा लागेल. त्याला दूर ठेवण्यासाठी डॉक्टर, शास्त्रज्ञ आणि जाणकार मंडळी जे नियम सांगत आहेत, ते काटेकोर पाळले पाहिजेत.
करोनाला गर्दी हा खरा धोका आहे, त्यामुळे शक्य तेवढी गर्दी टाळलीच पाहिजे. मास्कचा वापर आणि स्वच्छता या गोष्टीही तेवढ्याच महत्वाच्या आहेत.
रुग्णालयात राहून आम्ही करोनाशी संघर्ष करतोय. लवकरच बरे होऊन तुमच्या सेवेत पुन्हा येत आहोत. तुम्हीही बाहेर करोनाविरूद्धचा लढा सुरूच ठेवा, असं आवाहन कानडे यांनी केले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews