संगमनेर : शहराचा वाढता विस्तार आणि वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर संगमनेरकरांच्या निरोगी आरोग्यासाठी नगरपरिषद कटिबद्ध आहे.
महिलांसाठी कॉटेज हॉस्पिटलच्या जागेत महिला रुग्णालय आणि अर्बन कम्युनिटी हेल्थ सेंटर प्रस्तावित असून त्यासाठी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्यासमवेत बैठका झाल्याची माहिती नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांनी दिली. शहरातील महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय असावे, यासाठी नगरपरिषदने २०१०, २०१३ आणि २०१७ मध्ये शासनाकडे प्रस्ताव पाठवला.
मात्र, फारसा प्रतिसाद मिळाला नाही. कॉटेज रुग्णालयाच्या जागेत २००३ ते २००९ दरम्यान ग्रामीण रुग्णालय सुरू होते. रुग्णालयाच्या वाढत्या विस्तारामुळे जास्त जागा उपलब्ध करून देणे शक्य नसल्याने शासनाने हे रुग्णालय घुलेवाडी येथे हलवले.
या रुग्णालयात कार्यरत असलेला कॉटेज हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह तेथील अन्य प्रकारचा स्टाफदेखील घुलेवाडीच्या रुग्णालयात वर्ग झाला. शहरातील रुग्णांच्या सोयीसाठी कॉटेज हॉस्पिटल सुरू राहावे, तेथे स्वतंत्र वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी असावेत, अशी मागणी करण्यात आली.
मात्र, शासनाच्या उदासीनतेमुळे या रुग्णालयात अधिकारी आणि कर्मचारी उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या पुढाकाराने एसएमबीटी सेवाभावी संस्थेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी २००९ ते २०१५ या दरम्यान येथे नागरिकांना सेवा दिली.
त्यानंतर नगरपालिका, आमदार बाळासाहेब थोरात आणि तांबे यांच्या पाठपुराव्यातून येथे शहरी आरोग्य केंद्र मंजूर झाले. येथे असलेल्या २ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून दररोज शंभर-दीडशे रुग्णांना लाभ मिळत असून विविध साथींचे आजार, लसीकरण, गरोदर माता तपासणी आदींसह बाह्यरुग्ण विभाग सध्या सुरू आहे.
नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देताना नगरपरिषदेने २०१८ मध्ये पुन्हा एकदा स्वतंत्र अर्बन कम्युनिटी हेल्थ सेंटरचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला. महिला रुग्णालय आणि हेल्थ संेटरसाठी मंत्री सावंत यांच्यासोबत बैठकादेखील झाल्या असून या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यावर तो कार्यान्वित होईल.
नगरपरिषदेच्या कॉटेज हॉस्पिटलच्या जागेचे हस्तांतरणदेखील करण्यासंदर्भातील प्रस्ताव पाठवला आहे. महिला रुग्णालयात स्वतंत्र स्त्रीरोग तज्ज्ञ, फिजीशियन, भूलतज्ज्ञ, दंतरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, नर्सिंग स्टाफ व आवश्यक कर्मचाऱ्यांचीदेखील मागणी करण्यात आल्याचे तांबे यांनी सांगितले.