पारनेर :- कर्ज तसेच आर्थिक विवंचनेतून तालुक्यातील वनकुटे येथील सुनील तुळशीराम भगत (वय ३४) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
हा प्रकार बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडला. सुनील भगत हा वनकुटे येथे दुचाकी दुरुस्तीचे काम करीत होता. मंगळवारी सकाळी न्यायालयात काम असल्याने तो सकाळीच वनकुटे येथून निघाला.
वडिलांकडे तीन हजार रुपयांची मागणी केल्यानंतर वडिलांनी त्यास केवळ ३०० रुपये दिले. त्याचा राग त्याच्या मनात असल्याचे सुनील याने गळफास घेतल्यानंतर लिहून ठेवलेल्या चिठ्ठीतील मजकुरावरून उघड झाले.
‘नाना-नानी तुम्हाला पैसा प्यारा आहे, मुले नाहीत’, असा मजकूरही या चिठ्ठीत आहे. सरपंच राहुल झावरे हा माझा भाऊ आहे. त्याने माझे दुकान विकावे व कर्जाची रक्कम भरावी.
नाना, नानीला पैसे मागू नये, असेही या चिठ्ठीत नमूद करण्यात आले. पोलिसांनी ही चिठ्ठी ताब्यात घेतली असून त्यानुसार तपास करण्यात येत आहे.