उड्डाणपुलाच्या जागेसाठी संरक्षण मंत्र्यांसमवेत बैठक: खा. सुजय विखे पाटील

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नगर : शहरातील उड्डाणपुलाच्या कामासाठी आवश्यक असलेल्या संरक्षण विभागाच्या जागेच्या भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून संरक्षण मंत्री राजनाथसिंग यांच्या समवेत बुधवारी बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी मािहती खासदार डाॅ. सुजय विखे यांनी दिली.

संसदेच्या सुरू असलेल्या अधिवेशनादरम्यान खासदार डाॅ. सुजय विखे यांनी नगर शहरातील उड्डाणपुलाच्या कामाचा पाठपुरावा सुरू ठेवला आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन नगर शहराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाकडे लक्ष वेधले.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे प्रमुख आशिष शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या समवेत बैठक घेऊन संरक्षण विभागाच्या अखत्यारीत असलेल्या जागेचा प्रश्न मार्गी लावण्याचे निश्चित करण्यात आले होते.

या पार्श्वभूमीवर खा. डाॅ. सुजय विखे यांनी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेऊन उड्डाणपुलासाठी आवश्यक असलेल्या जागेचे भूसंपादन होणे आवश्यक आहे. मात्र, सदर जागा संरक्षण विभागाच्या ताब्यात असल्याने रखडलेल्या उड्डाणपुलाच्या कामाबाबत त्यांनी संरक्षणमंत्र्यांना मािहती देऊन निवेदन दिले.

यासंदर्भात केद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन बुधवारीच रक्षा भवनमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित करून या प्रश्नाबाबत निर्णय करण्याचे आश्वासन दिले असल्याचे खा. डाॅ. सुजय विखे यांनी सांगितले.

या बैठकीत डाॅ. विखे यांनी संरक्षण विभागाच्या हद्दीत समाविष्ट असलेल्या भागातील नागरी प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संसद सदस्यांना जादा अधिकार देण्याची मागणी केली असून याबाबतचे निवेदनही दिले असल्याचे स्पष्ट केले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24