अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:- कोणतीही कायदा व सुव्यवस्था परिस्थती निर्माण झाली की त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिसांवर येऊन पडते. आणि ती यशस्वी करण्यासाठी सामाजिक हितासाठी पोलिसांना कडक भूमिका घ्यावी लागते.
ते रुचत नाही. मग पोलिसांची प्रतिमा खराब होते. मात्र कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये तसे झाले नाही. या काळात पोलिसांनी अहोरात्र जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावले. त्यामुळे पोलिसांची प्रतिमा सुधारली असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले.
ते रविवारी श्रीरामपुरात मानवता जीवन कल्याण सेवाभावी संस्था व अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिस व जनता यांच्यात सामाजिक सलोखा रहावा यासाठी आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
अध्यक्षस्थानी आमदार लहू कानडे होते. व्यासपीठावर नगराध्यक्ष अनुराधा आदिक, अतिरिक्त पोलिस अधिक्षक दीपाली काळे, पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, राहुल मदने, पोलिस निरीक्षक सानप, मीनाताई जगधने, डॉ. प्रेरणा शिंदे, अविनाश आपटे, डॉ. जगधने, सारंगधर निर्मळ, अनिल साळवे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी पाटील म्हणाले, सर्वांसाठी कोरोना कठीण गेला.
लॉकडाऊनमध्ये कडक अेमलबजावणीमुळे पोलिसांची प्रतिमा बिघडते की अशी भीती होती. मात्र सामाजिक दृष्टिकोन सकारात्मक झाला. पोलिसांचा प्रतिमा चांगली झाली. एकाकीपणा कमी करण्यासाठी व सामाजिक सलोखा राखण्यासाठी खेळाचा फायदा होतो. त्यामुळे क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या गेल्या.