सुप्रिया सुळे ठरल्या नंबर वन खासदार!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना पुन्हा एकदा सर्वोत्कृष्ट खासदार म्हणून निवडण्यात आलेले आहे. लोकसभा सदस्य म्हणून ही त्यांची तिसरी टर्म आहे.

लोकसभेत विविध प्रश्न उपस्थित करत पुन्हा एकदा त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. १७ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात त्यांना सर्वोत्कृष्ट खासदार म्हणून निवडण्यात आलेले आहे. . सुप्रिया सुळे २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या आहेत.

संसदेच्या पहिल्याच अधिवेशनात सुप्रिया सुळे यांची कामगिरी अतुलनीय ठरली आहे. संसदेच्या पहिल्या अधिवेशनात एकूण ३४ चर्चासत्रांमध्ये त्यांनी आपला सहभाग नोंदविला आहे. संसदेत त्यांनी १४७ प्रश्न मांडले, तसेच सभागृहात चार खाजगी विधेयकेही मांडलेली आहेत.

विशेष महत्त्वाची बाब म्हणजे पहिल्या सत्रातील त्यांची उपस्थिती १०० टक्के भरली आहे. . मागील पंचवार्षिक काळात १६व्या लोकसभेतही सुप्रिया सुळे यांना सर्वोत्कृष्ट खासदार म्हणून निवडण्यात आलेले होते.

मागील लोकसभेतही त्यांनी ११८१ प्रश्न उपस्थित केलेले होते आणि एकूण २२ खाजगी विधेयके मांडलेली होती. तसेच १५२ वेळा चर्चेत सहभागी झाल्या होत्या. मागील संसदेतही त्यांची उपस्थिती १०० टक्के इतकीच होती.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24