त्या गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-नगर जिल्ह्यात दरोड्खोरी, चोरी, घरफोडीचे घटनामध्ये सातत्याने वाढ होत आहे. संपूर्ण जिल्ह्यात चोरटयांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे मात्र नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे.यातच सराफ व्यापाऱ्यांना लुटण्याच्या अनेक घटना जिल्ह्यात घडल्या आहेत.

याच अनुषंगाने जिल्ह्यातील सराफ सुवर्णकार व्यावसायिकांना लुटणाऱ्या गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई करावी, अशी मागणी सराफ व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. निवेदनात म्हटले आहे की, कोरोनामुळे सर्व बाजारपेठा विस्कळीत झाल्या आहेत.

अशा परिस्थितीत बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या. आर्थिक परिस्थिती विस्कळीत झाल्यामुळे जिल्ह्यात चोऱ्या, दरोडे, बॅग लिफ्टिंगच्या घटना, तसेच सोनार व्यावसायिकांना लुटण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. बऱ्याच प्रकरणात आरोपी पकडले गेल्यानंतर त्या आरोपींना जामीन होऊन ते पुन्हा वरील गंभीर गुन्हे करतात.

त्यामुळे गुन्ह्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. म्हणून वरील गंभीर गुन्हे करणाऱ्या आरोपींना मोक्का लावणे आवश्यक आहे. बऱ्याच घटनांमध्ये सराफांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सराफ सुवर्णकार व्यावसायिकांना आपल्या जीवाचे व मालमत्तेचे रक्षण करता यावे, यासाठी रिव्हॉल्व्हरचे लायसन्स त्वरित मिळणे गरजेचे आहे.

सराफांना लुटणाऱ्या गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यासाठी निश्चित प्रयत्न करू, तसेच शस्त्र परवाना मिळण्यासाठीही जिल्हाधिकारींकडे शिफारस करण्याचे आश्वासन यावेळी पाटील यांनी व्यापाऱ्यांना दिले.

पोलिस व सराफ यांच्यात घनिष्ठ संबंध निर्माण होऊन गुन्ह्यांचा तपास लवकर लागावा यासाठी सर्व सराफ व्यावसायिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24