उपनेते अनिल राठोड यांना विधानपरिषदेवर घेऊन पालकमंत्री करा – जगताप

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नेवासा : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क मैदानावर महाराष्ट्र राज्याचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताच नेवासा शहरात शिवसैनिकांनी पेढे वाटून तसेच फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

तसेच जिल्ह्यातील शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांना विधानपरिषदेवर घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री करावे, अशी मागणी आपण मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचे शिवसेनेचे नेवासा शहरप्रमुख नितीन जगताप यांनी सांगितले.

गुरुवारी सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेना नेवासा शहरप्रमुख नितीन जगताप, महिला आघाडीच्या पूजा लष्करे यांच्यासह इतर शिवसैनिकांनी नगरपंचायत चौकात एकत्र येत जोरदार घोषणाबाजी करत एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी मोठ्या प्रमाणावर फटाके फोडण्यात आले. यावेळी जगताप म्हणाले की ‘हर हिंदू की यही पुकार पहले मंदिर फिर सरकार’ हे स्वप्न आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूर्ण केले. हिंदुत्व हा शिवसेनेचा धागा आहे.

शिवसेना कधीही हिंदुत्व सोडणार नाही. तसेच हे सरकार राज्यातील शेतकऱ्याच्या सर्व अपेक्षा पूर्ण करील, अशी आशा व्यक्त करत असल्याचे ते म्हणाले.

युवा सेनेचे जिल्हाप्रमुख नीरज नांगरे म्हणाले की, युवासेना प्रमुख आ. आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील विविध कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असून तालुक्यातील विविध निवडणुकांमध्ये ही भगवा फडकविणार असल्याचे सांगितले.

यावेळी महिला आघाडीच्या तालुका प्रमुख पूजा लष्करे म्हणाल्या, पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेतला आहे. तसेच शिवसैनिकांसाठी हा ऐतिहासिक दिवस असून, हिंदुत्व घेऊनच यापुढेही लढत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Entertainment News Updates

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24