संगमनेर : निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांची विनाकारण बदनामी व चारित्र्यहनन करणाऱ्या विकृत व्यक्ती व शक्तींचा जाहीर निषेध करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन मंगळवार दि. २५ फेब्रुवारी रोजी दुपारी वारकरी संप्रदायाच्या वतीने तहसीलदार अमोल निकम यांना देण्यात आले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इंदोरीकर महाराजांच्या वक्तव्याचा विपर्यास करून काही विकृत व समाज विघातक व्यक्तींनी महाराजांची विनाकारण बदनामी चालविली आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून इंदोरीकर महाराज समाजप्रबोधनाचे काम करीत आहे.
यातून त्यांनी अनेक अनिष्ठ रुढी, प्रथा, परंपरा, अंधश्रद्धा, पर्यावरण, कुटुंब व्यवस्थेवर प्रकाश टाकून समाजप्रबोधन केले आहे. त्यांच्या विनोदी शैलीमुळे तरुण कीर्तनाकडे वळले असून, त्यांना व्यसनापासून प्रवृत्त केले आहे. त्यामुळे हिंदू धर्म व वारकरी संप्रदायाला बदनाम करू पाहणाऱ्यांना कदापि यशस्वी होवू देणार नसल्याचा निर्धारही व्यक्त करून विकृत मानसिकता असणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करून त्यांना जिल्हा बंदी करावी, अशी मागणी वारकरी संप्रदायाने निवेदनातून केली आहे. तहसीलदार निकम यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी वारकरी साहित्य परिषदेचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष व्यंकटेश महाराज सोनवणे, तालुका साहित्य परिषद अध्यक्ष सुनील महाराज मंगळापूरकर, युवा वारकरी अध्यक्ष रोहिदास बर्गे, महिला कीर्तनकार जयश्री तिकांडे, आनंद वर्पे, अशोक सातपुते, ह.भ.प राम महाराज पवळ, रवि म.आहेर, विशाल महाराज तिकांडे, सचिन मापारी, संदीप लांडगे, कौशिक महाराज, येवले महाराज, नीलेश पर्बत, शंकर सातपुते, पवार महाराज, अलकाताई दुबे, माऊली गुंजाळ आदी वारकरी, महाराज मंडळी उपस्थित होते.