सोलापूर : पतंग-मांजा घेऊन देतो, असे सांगून दहा वर्षीय भाच्च्यास रेवणसिध्देश्वर मंदिराच्या पाठीमागे नेऊन मामाने गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केला. भाच्चा बेशुध्द होऊन निपचित पडल्याने तो गत:प्राण झाल्याचे समजून मामा तेथून पसार झाला.
परंतु दैव बलवत्तर म्हणून भाच्चा वाचला. तो शुध्दीवर आल्यानंतर मामाच्या ‘कंसगिरी’चे बिंग फुटले. पोलिसांनी तातडीने त्या ‘कंसमामा’स ताब्यात घेतले आहे.
विठ्ठल वाघमारे (वय २५, रा. पनवेल, मुंबई) असे त्या ‘मामा’चे नाव आहे. विठ्ठल वाघमारे हा गेल्या आठ दिवसापूर्वी सोनिया नगर, विजापूर नाका झोपडपट्टी परिसरामध्ये बहिणीकडे आला होता. आठ दिवस राहिल्यानंतर त्याने बुधवारी सायंकाळी दहा वर्षीय भाच्चा विनायक गिरमल काळे याला पतंग-मांजा देण्याचे आमिष दाखवून रेवणसिध्देश्वर परिसरामध्ये घेऊन गेला.
या ठिकाणी त्याने विनायकला ठार मारण्याच्या उद्देशाने त्याचा गळा दोरीने आवळला. श्वास गुदमरल्याने विनायक जागेवरच निपचित पडला. बेशुध्द पडलेल्या विनायकला जागेवरच सोडून तेथून कंसमामा पसार झाला.
घरातून बाहेर गेलेला विनायक परत आला नाही, म्हणून कुटुंबीयांनी सगळीकडे शोधाशोध केली; मात्र त्याचा शोध लागत नव्हता. शेवटी विनायकच्या कुटुंबीयांनी विजापूर नाका पोलीस ठाणे गाठून या संदर्भात मिसींग केस दाखल केली.
यावेळी वडील गिरमल यांच्यासोबत दोन पोलीस कर्मचाऱ्यांनीही विनायकचा शोध घेण्यास सुरुवात केली. कंबर तलाव, धोबी घाट आदी परिसरामध्ये शोध घेत असताना गिरमल यांना एका तरुणाचा फोन आला. त्याने विनायक हा रेवणसिध्देश्वर मंदिराजवळील परिसरामध्ये असल्याचे सांगितले.
तेव्हा वडील गिरमल यांनी धावत जाऊन विनायकला जवळ घेतले. तेव्हा मुलाने मामानेच गळा दाबण्याचा प्रकार केल्याचे सांगितल्याने वडील मात्र चक्रावून गेले होते.
या साऱ्या प्रकारानंतर विनायकला उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. यावेळी विनायकच्या गळ्यावर दोरीने आवळल्याचे वण होते, शिवाय डोळे देखील लाल झालेले होते.