अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :-जामखेडचे पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी एकाच दिवशी तब्बल ११ हॉटेलवर कारवाई करून तालुक्यातील अवैध व्यावसायिकांना चांगलाच दणका दिला आहे.
तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकी पार पडत आहेत, त्या शांततेत, निर्भय आणि लोकशाही वातावरणात पार पडाव्यात,
यासाठी पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी आता अवैध व्यवसायांचा बिमोड करण्यासाठी कंबर कसली आहे.निवडणूक काळात दारुचा महापूर रोखण्यासाठी जामखेड पोलिसांनी संपुर्ण तालुक्यात धाडसत्र हाती घेतले आहे.
जामखेड पोलिसांच्या विशेष पथकाने काल रात्री उशीरापर्यत तालुक्यातील खर्डा परिसरातील हॉटेल रोहितराजे, हॉटेल बळीराजे, हॉटेल कन्हैया, हॉटेल रंगोली, हॉटेल प्रताप , हॉटेल अजिंक्यतारा, हॉटेल रंगोली, हॉटेल शिवशाही, हॉटेल तुळजाई , हॉटेल रुद्रा अश्या ११ हॉटेलवर छापा टाकत सुमारे६१ हजार रूपये किमतीचा अवैध देशी दारूचे साठे जप्त केले.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली व पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश जानकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. याप्रकरणी पोलीस स्टेशनला अकरा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.