अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :-शेळ्या चारण्यासाठी शेतात जाणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर नात्याने आजोबा असलेल्या ५५ वर्षीय व्यक्तीने वारंवार अत्याचार केले. त्यातून ती मुलगी गर्भवती राहिली. नात्याला काळिमा फासणारा हा घृणास्पद प्रकार वडगाव सावताळ येथे घडला.
पारनेर पोलिसांनी नराधमास अटक केली. त्याने अत्याचारांची कबुली दिली असल्याचे पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांनी सांगितले. आरोपीला सात दिवस पोलिस कोठडी मिळाली असून पीडित मुलीला पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आॅक्टोबर २०२० ते १७ जानेवारी २०२१ दरम्यान पीडित मुलगी शेळ्या चारण्यासाठी शेतात जात असताना आजोबाने वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केले. कोणाला काही सांगायचे नाही, अशी धमकीही नराधमाने दिल्याने घाबरलेल्या मुलीने घरी कोणालाही या प्रकाराची माहिती दिली नाही.
काही दिवसांपूर्वी तिच्या पोटात वेदना होऊ लागल्याने आईने तिला विश्वासात घेऊन विचारले असता तिने आपल्यावर झालेल्या अत्याचारांची माहिती दिली. पीडितेच्या आईने मुलीला खासगी दवाखान्यात उपचारांसाठी नेले असता ती गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले.
नराधम आजोबावर बलात्कार, तसेच बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचे प्रकरण नातेसंबंधातील असल्याने आरोपीने आपसात मिटवण्याचा प्रयत्न केला. समाजात होणाऱ्या नाचक्कीच्या भितीने पीडितेचे आई-वडीलही प्रकरण मिटवण्यास तयार झाले.
त्यानंतर गर्भपात करण्यासाठी मुलीला मुंबईला नेण्यात आले. मात्र, दोन महिने झाले असल्याने गर्भपात करण्यास डॉक्टरांनी नकार दिला. त्यानंतर पुण्यात गर्भपाताबाबत विचारणा करण्यात आली. संबंधित डॉक्टरने पोलिसांना कळवले, असे आरोपीने कबुलीजबाबात सांगितले. पुण्यातील बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपासासाठी पारनेर पोलिसांकडे वर्ग केला.