‘असे’ झाले त्या आरोपींचे कट रचून पलायन !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

कर्जत : कर्जत पोलिसांच्या ताब्यातील पाच आरोपी काल पळून गेल्यानंतर तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस महानिरिक्षक छोरिंग दोरजे यांनी आज येथे भेट देऊन पाहणी केली. आज एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे समजते.

येथील उपकारागृहातून. दि ९ फेब्रु. रोजी पाच आरोपींनी छतावरून पलायन केले. याबाबत आज या बराकीतील वस्तुस्थिती पाहिली असता, बराकीत प्लायवूडचे लाकडी सिलिंग असून, त्यावर मजबूत जाड लोखंडी गजाचे संरक्षक आवरण आहे व त्याच्यावर कौलारू छत आहे. बराकीत जमिनीपासून अंदाजे पंधरा ते सोळा फुटांवरील प्लायवूडचे सिलिंग दोन ठिकाणी कापण्यात आल्याचे दिसत असून, यातील बराकीच्या दरवाज़ाच्या वरील बाजूचे दोन गज कापण्यात आले आहेत.

काल सहा ते सात वाजण्याच्या सुमारास पळालेल्या पाच आरोपींच्या शाधार्थ पोलिसांची सात पथके विविध भागात पाठविली आहेत. लवकरच या आरोपींना आम्ही पकडू, असे जिल्ह्याचे प्रभारी पोलिस अधीक्षक सागर पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.

नाशिक परिक्षेत्राचे महानिरीक्षक छोरिंग दोरजे यांनी दुपारी येथे भेट देऊन पाहणी केली, या वेळी पाटील यांच्यासह उपविभागीय अधिकारी अर्चना नष्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव, तहसीलदार सी. एम. वाघ, पो. नि. सुनील गायकवाड, सहा. पो. नि. सुरेश माने उपस्थित होते. आज पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. फरार आरोपींना चार इसमांनी मदत केली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सदरची घटना घडली त्यावेळी आर. बी. नागरगोजे, पळसे, माळशिकरे व कोल्हे हे चार कर्मचारी नियुक्तीवर होते. पोलिस प्रशासन कोणावर कोणती कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बराकीत सीसीटीव्ही कॅमेरा असून, त्यामध्ये आरापींच्या हालचाली टिपल्या असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र इतर सविस्तर माहिती देण्याचे टाळले. या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेकानी पोलिसांना धारेवर धरले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24