अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगाव शिवारात ८ मे रोजी सोन्याच्या दागिन्यांवरुन झालेल्या खून प्रकरणातील दोन आरोपींना शनिवारी उपचारांसाठी शिरसगाव येथील ग्रामीण आरोग्य रुग्णालयात नेण्यात आले होते.
परत कारागृहात येत असताना हे आरोपी बेड्यांसह पोलिसांच्या ताब्यातून फरार झाले. एकास पोलिसांनी शनिवारी रात्रीच उसाच्या शेतात पकडले. दुसरा मात्र फरार होण्यात यशस्वी झाला.
मूळचा कर्जत येथील मयूर काळे पत्नीसमवेत पाच वर्षांपासून मुठेवाडगाव येथे राहत होता. काही दिवसांनंतर आईने तेथीलच सचिन काळे याच्याशी दुसरा विवाह करुन घर सोडले. मुलगी व जावयाकडे असलेल्या दागिन्यांच्या मागणीसाठी आईने सचिन काळे याला मित्रांबरोबर मुलीकडे पाठवले.
सचिन काळे, संदीप काळे, सूरज काळे व बुंदी भोसले हे मयूरच्या घरी गेले. त्यांनी मयूर व त्याची पत्नी मोनिकाकडे सोन्याच्या दागिन्यांची मागणी केली. वाद विकोपाला गेल्यानंतर सचिनने लोखंडी पाइप, तलवार, दांडा व दगडाने मयूरला मारहाण केली. त्यात मयूरचा मृत्यू झाला. मोनिकाही जखमी झाली. मयूरचा भाऊ तैमूर वाद सोडवण्यासाठी गेला असता आरोपींनी त्याचे घर पेटवून दिले.
मोनिकाने दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलिसांनी सचिन, संदीप, सूरज व भोसले यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंदवला. पोलिसांनी सचिन, सूरज व बुंदी ऊर्फ रुपचंदला गजाआड केले. यातील सचिन व रूपचंद न्यायालयीन कोडठीत आहेत.
त्यांचे व आरोपी गोविंद गुंजाळ व सुधीर सरकाळे यांचे शनिवारी रात्री पोट दुखू लागल्याने काॅन्स्टेबल दत्तात्रय शिंदे व संजय घोरपडे यांनी जीपमधून त्यांना ग्रामीण रुग्णालयात नेले.
परत येताना गाडी हरेगाव फाट्यानजीक येताच मागील दरवाजा उघडून सचिन व रूपचंद पळून गेले. पोलिसांनी रात्री ११ च्या सुमारास वडाळा शिवारातील उसातून रूपचंदला ताब्यात घेतले. मात्र, सचिन अंगावरील कपडे टाकून फरार झाला. आरोपीच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com