कर्जत जामखेडमधून पराभूत झालेले भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांनी रोहित पवारांच्या आमदारकीला उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. चुकीच्या पद्धतीने निवडणूक लढवल्याचा आरोप राम शिंदें यांनी रोहित पवारांवर केला.
रोहित पवार यांनी निवडणुकीत मतदारांना प्रत्येकी एक हजार रुपये वाटले, असा गंभीर आरोप राम शिंदे यांनी याचिकेत केला आहे. याशिवाय रोहित पवारांनी निवडणूक खर्चही लपवला, निवडणुकीत बारामती अॅग्रोच्या कर्मचाऱ्यांचा गैरवापर केला,
सोशल मीडियात हेतूपुरस्सर राम शिंदेंची बदनामी केली, असे अनेक आरोप याचिकेत करण्यात आले आहेत. राम शिंदे यांच्या याचिकेची दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रोहित पवार यांना नोटीस बजावली आहे.
दरम्यान याबाबत रोहित पवार एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, मी प्रामाणिकपणे निवडणुक लढवली आहे. निवडणुकीत माझा विजय झाला तो लोकांचा निर्णय होता. मात्र तरीदेखील भाजपाचे पराभूत झालेले उमेदवार राम शिंदे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली असं रोहित पवार यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीदरम्यान कर्जत जामखेडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भ्रष्ट मार्गाचा वापर केल्याचा आरोप करणारी याचिका माजी मंत्री आणि भाजपा नेते राम शिंदेंनीन्यायालयात दाखल केली आहे.
राम शिंदे यांच्या या आरोपानंतर न्यायालयाने रोहित यांना समन्स बजावत त्यांना बाजू मांडण्याचे आदेश दिले असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र मला कोणत्याही प्रकारचे समन्स आलेले नसल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे.