अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :- संगमनेर तालुक्यातील शिरसगाव गावांतर्गत असलेल्या पांढरे वस्ती येथील सुनंदा कुंडलिक भोजणे (वय ४५) या महिलेचे अज्ञात कारणावरुन खून करण्याच्या उद्देशाने दोघांनी अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली होती.
नुकतेच या महिलेचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांच्या अथक प्रयत्नांनंतर सदर महिलेचा मृतदेह डोंगराच्या दरीत आढळला आहे.
या प्रकरणी दोघा संशयितांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाने तालुक्यात खळबळ माजली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, सुनंदा कुंडलिक भोजणे (वय.४५, पांढरे वस्ती, शिरसगाव) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. सदर महिला शिरसगाव येथे एकटी राहते. सदर महिला 8 जानेवारीपासून गायब झाली होती.
याबाबत तिचा मुलगा दिनेश भोजणे याला माहिती समजल्याने त्याने तालुका पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली होती. तिचा मुलगा व शेजारी राहणार्या ग्रामस्थांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत पाहिले असता घरामध्ये सुकलेल्या रक्ताचे डाग आढळले.
चंद्रभान चांगदेव चौधरी (रा. शिरसगाव) व सुभाष नाना सूर्यवंशी (रा. लिंगदेव) यांचे आपल्या घरी येणे-जाणे होते. अज्ञात कारणावरून या दोघांनीच आईचे अपहरण करून तिचा खून केल्याची तक्रार तालुका पोलीस ठाण्यात केली होती. यानंतर पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार व त्यांच्या सहकार्यांनी शिरसगाव येथील घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
त्यांनाही रक्ताचे डाग आढळले. पोलीस पथकाने शिरसगाव येथील डोंगरदर्यांमध्ये पाहणी केली. मोठ्या प्रयत्नांनंतर पाचरुपी दरीमध्ये सुनंदा कुंडलिक भोजणे हिचा मृतदेह आढळला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. पुढील तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.