अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 :मुंबई व पुणे येथून आलेल्यांना गावात संस्थात्मक क्वारंटाईन केले जाते. क्वारंटाइन केलेल्या अशाच एका कुटुंबाबाबत ह्रदय हेलावून टाकणारी घटना अकोले तालुक्यात घडली.
मुलीचा मृत्यू तर झालाच परंतु तिच्या मृत्यूचा दाखला मिळवण्यासाठीही तिच्या पालकांना रूग्णालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. आज महिना लोटला तरी मुलीचा मृत्यू कशाने झाला हेच त्यांना सांगितलेले नाही.
जूनमध्ये विश्वास शिंदे व स्वाती शिंदे मुलुंड येथून आपल्या अकोले तालुक्यातील मूळ गावी शिळवंड घोटी येथे आले. नियमानुसार त्याना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले.
त्याच काळात एकेदिवशी त्यांची मुलगी अनन्या (वय ५ वर्षे) हिला पहाटे संर्पदंश झाला. मात्र, डॉक्टरांनी कोरोनाचा संशय व्यक्त करीत जबाबदारी ढकलली. तिला तातडीने जवळच्या कोतूळ येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले.
ज्या सापाने दंश केला, त्याला मारण्यात आलेले होते. मारलेला साप आणि मुलीला रुग्णालयात घेऊन गेल्यावर शिंदे यांनी तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली.
परिचारिकांनी शिंदे यांना एक इंजेक्शन आणायला सांगितले. त्यांनी ते आणून दिले. त्यानंतर दहा मिनिटांत शिंदे यांना सांगण्यात आले की, मुलीला सर्पदंश झालेला नाही, तर करोनाची लक्षणे दिसत आहेत.
तिला संगमनेरला हलविण्यास सांगण्यात आले. रुग्णवाहिकेतून नेत असताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. रुग्णवाहिकेत वैद्यकीय सुविधा नव्हत्या. त्यामुळे डोळ्यादेखत मुलीचा मृत्यू पाहावा लागला.
या घटनेला आता महिना उलटला आहे. तरी त्या मुलीचे मृत्यूचा दाखला मिळाला नाही. त्यासाठी ते पालक दररोज दवाखान्याचे उंबरे झिजवत आहेत. आपली मुलगी नेमकी कशाने गेली.
हेही हे प्रशासन सांगू शकत नसेल तर संयमाचा बांध फुटणारच. त्या मुलीच्या आईने वेदना लपवत प्रशासनाच्या सावळ्या गोंधळाविरोधात लढा पुकारला आहे. आम्हाला न्याय मिळावा, जे दोषी असलतील त्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा आत्मदहन करू, असा इशारा शिंदे दाम्पत्याने दिला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews