संगमनेर : संगमनेर तालुक्यातील देवकौठे शिवारात दुचाकीवरून पडल्याने यकृताला मार लागलेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी सात वाजता मृत्यू झाला.
ऋतुजा मच्छद्रिं आरोटे (वय १८, रा. देवकौठे) असे या दुर्दैवी तरुणीचे नाव आहे. या घटनेने देवकौठे गावावर शोककळा पसरली. देवकौठे ते चिंचोलीगुरव रस्त्यावरून रविवारी साडेचारच्या सुमारास ऋतुजा आरोटे ही भावाला दुचाकीवरून घरी घेऊन जात होती.
दरम्यान, सायाळे फाट्यावर दुचाकी रस्त्याच्या बाजूला गटारात पडून ऋतुजा जखमी झाली होती. गाडीचा हॅन्डल ऋतुजाच्या पोटाला लागून यकृताला जखम झाली. तिला उपचारार्थ नाशिक येथील शताब्दी हॉस्पिटमध्ये दाखल करण्यात आले होते.
यकृताला जबर मार लागल्यामुळे तिच्यावरील शस्रक्रिया यशस्वी होवू शकली नाही. मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास ऋतुजाचा मृत्यू झाला.
प्राथमिक शिक्षक मच्छद्रिं बाबुराव आरोटे यांची ती मुलगी होती. देवकौठे येथे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण झालेली ऋतुजा बारावी विज्ञान शाखेत सह्याद्री कॉलेजमध्ये ९७ टक्के मार्क मिळवून प्रथम आली होती.
नीट परिक्षेत उत्तीर्ण होऊन बीएएमएस कोर्सला तिला प्रवेश मिळला होता. मात्र, एमबीबीएस होण्याचा तिचा व वडिलांचा मानस होता. त्यामुळे सध्या ती लोणी येथे प्रवेशासंदर्भात शिक्षण घेत होती.
मात्र, अपघाती मृत्यूने तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न अधुरे राहिले. तिच्या पश्चात वडील, आई, आजी, आजोबा, भाऊ, बहिण व चुलते असा परिवार आहे.