अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :- जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या दिशानिर्देशात सुरु आहे. अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीत ९ हजार १० इच्छूकांनी आपले अर्ज माघारी घेतले.
प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात आता १३ हजार १९४ उमेदवार मतदारांचा कौल आजमावणार आहेत. दरम्यान ७६७ पैकी जिल्ह्यातील ४६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.
राज्य निवडणूक आयोगाच्या घोषणेनुसार कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या जिल्ह्यातील तब्बल ७६७ ग्रामपंचायतींच्या पंचावर्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली आहे. जिल्ह्यात एकूण एक हजार ३१८ ग्रामपंचायती आहेत.
अंतिम मुदतीपर्यंत ७६७ ग्रामपंचायतींसाठी एकूण २३ हजार ८०१ अर्ज दाखल झाले होते. छाननी प्रक्रियेनंतर २३ हजार १४८ उमेदवारी अर्ज वैध ठरले. दरम्यान,सोमवार दि. ४ जानेवारी रोजी अर्ज माघारीची अंतिम मुदत होती.
या मुदतीत जिल्हाभरात एकूण ९ हजार १० इच्छूकांनी आपले अर्ज माघारी घेतले.त्यामुळे प्रत्यक्ष निवडणूक रिंगणातील उमेदवारांची संख्या १३ हजार १९४ झाली. दरम्यान, माघारीच्या मुदतीनंतर जिल्ह्यातील ४६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.
मात्र,अकोले, कोपरगाव, राहुरी आणि शेवगाव तालुक्यात एकही ग्रामपंचायत पूर्णत: बिनविरोध होवू शकली नाही. जामखेड तालुक्यात सर्वाधिक म्हणजे १० ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून पारनेरमध्ये ९, नेवासा-७, राहाता-६,संगमनेर-४,नगर आणि पाथर्डी प्रत्येकी -३,कर्जत-२ आणि श्रीरामपूर व श्रीगोंदा प्रत्येकी एक ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे.