अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :-जगभर ख्याती असलेले अहमनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील साई मंदिर आता दर्शनासाठी खुलं करण्यात आलं असून भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.
शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी शिर्डी साई संस्थानकडून आता ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. तसा फलकच मंदिराबाहेर लावण्यात आला आहे.
मात्र साईसंस्थानच्या याच विनंती फलकावर भूमाता ब्रिगेडच्या समर्थकांनी काळा रंग फेकून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र सुरक्षारक्षकांनी व पोलिसांनी दोन महिलांसह तिघांना ताब्यात घेतले.
त्यानंतर सूचना फलक पुसून स्वच्छ करण्यात आला. यापूर्वी 10 डिसेंबर रोजी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई येथील फलक हटविण्यासाठी शिर्डीला येत होत्या. मात्र, त्यांना नगर जिल्ह्याच्या सीमेवरच अडवून पोलिसांनी परत पुण्याला पाठवले होते.
त्यावेळी त्यांनी येत्या 31 डिसेंबरपर्यंत फलक हटविले नाहीत, तर पुन्हा शिर्डीत येऊन फलक हटवू, असा इशारा दिला. ग्रामस्थांनी एकत्र येत त्यांना विरोध करण्याची भूमिका घेतली होती.
दरम्यान काल गुरुवारी याच विनंती फलकावर भूमाता ब्रिगेडच्या समर्थकांनी काळा रंग फेकून या प्रकरणाचा निषेध केला. पोलिस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या माहितीनुसार, या तिघांनीही आपण भूमाता ब्रिगेडचे समर्थक असल्याचे सांगितले. या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.