अहमदनगर ब्रेकिंग : शेतीतली महावितरणची विजेची तार तुटूली ! आणि 20 गुंठे ऊस जळून खाक !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmadnagar breaking : सर्वत्र दिपावली निमित्त आनंद उत्सवाचे वातावरण असताना संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथील शेतकरी विलास बाळासाहेब भुसाळ यांचा तब्बल २० गुंठे ऊस जळून खाक झाला आहे. त्यामुळे भुसाळ यांचे अंदाजे १ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

याबाबत स्थानिक नागरिकांकडून समजलेली माहिती अशी की, घोलप वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत गट नंबर ५३० / २ मध्ये विलास बाळासाहेब भुसाळ यांचे ऊसाचे क्षेत्र आहे.

काल रविवारी सकाळी सर्वत्र दिपावलीची धामधूम सुरू होती. अचानकपणे दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास भुसाळ यांच्या ऊसाच्या शेतीतून गेलेली महावितरणची विजेची तार तुटून खाली पडली.

त्यामुळे या ऊस क्षेत्राला आग लागली. आगीचे व धुराचे लोळ हवेत दिसू लागल्याने माजी ग्रामपंचायत सदस्य विजय शेळके, संदीप थोरात, किसन खेमनर, संतोष सांबरे, सचिन भुसाळ, मदन भुसाळ, प्रशांत शेळके, भगवान मैड, निलेश वाघमारे,

मच्छिंद्र वाघमारे, कैलास भुसाळ, गोकुळ खेमनर, विशाल उंबरकर, लहाणू डोखे, सोमनाथ भुसाळ, संपत भुसाळ आदींसह स्थानिकानी घटनास्थळी धाव घेत शर्थीचे प्रयत्न करत ही आग विझवण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे परिसरातील ऊस तसेच इतर शेती पिकाची मोठी वित्तहानी टळली आहे.

या घटनेची माहिती मिळताच महावितरणचे कर्मचारी अजय गिते, किरण उंबरकर, एकनाथ खेमनर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे. तसेच कामगार तलाठी यांना याबाबत माहिती देण्यात आली असून

या घटनेचा ते उद्या पंचनामा करणार असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. दरम्यान, ऐन सणासुदीच्या काळात शेतकरी विलास भुसाळ यांचे मोठे अर्थिक नुकसान झाले असून त्यांना अर्थिक भरपाई मिळावी, अशी मागणी स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.