झाशी : मध्य प्रदेशातील झाशी येथील सिपरी बाजार भागातील अंगावर शहारे उभे करणारी घटना सीसीटीव्ही फुटेजमुळे समोर आली आहे. झाले असे की, मिठाईच्या दुकानाबाहेर स्कूटीवर पुढे बसलेल्या मुलीने अचानक गाडीचे सेल्फ बटन दाबले.
त्यामुळे स्कूटी थेट दुकानात घुसली. जिलेबीचा पाक आणि उकळत्या तेलात मुलगी आणि तिचे वडील जाऊन पडले. त्यामुळे मुलगी आणि वडील गंभीररीत्या भाजले. दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुलीची प्रकृती गंभीर असून, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये बंदिस्त झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
झाशीच्या सिपरी बाजार ठाणे परिसरांतर्गत टंडन मार्गाजवळ एक मिठाईचे दुकान आहे. या दुकानाबाहेर गरम पाकाची कढई आणि उकळत्या तेलाची कढई ठेवलेली होती.
त्याचवेळी एक पाच वर्षांच्या मुलीसह तिचे वडील मिठाई खरेदी करण्यासाठी आले होते, त्यांनी दुकानाबाहेर आपली स्कूटी उभी केली आणि गाडीवरून उतरणारच होते, त्याचवेळी त्यांच्या मुलीने अचानक सेल्फ दाबून स्कूटी स्टार्ट केली. त्यामुळे स्कूटी थेट दुकानात गेली.
दुचाकीच्या धडकेने उकळत्या पाक आणि तेलात मुलगी आणि तिचे वडील जाऊन पडले. यामुळे ते दोघे गंभीररीत्या भाजले.