अहमदनगर: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मौनव्रताच्या चौथ्या दिवशी म्हसणे फाटा येथील समर्थ अकॅडमीच्या विद्यार्थिनींसह वाशिम व मालेगाव येथील विद्यार्थ्यांनी राळेगणसिद्धीत येऊन हजारे यांच्या आंदोलनास पाठिंबा दिला.
दरम्यान, दिल्लीतील निर्भयाला न्याय मिळेपर्यंत माघार नाही, असा निर्धार विद्यार्थ्यांना दिलेल्या लिखित संदेशाद्वारे हजारे यांची जाहीर केले. जेथे अन्याय अत्याचार होतो, त्या विरोधात आजवर हजारे यांनी आवाज उठवून सामन्य जनतेला न्याय मिळवून दिला आहे.
महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना शिक्षा सुनावल्यानंतरही त्याची अंमलबजावणी लवकर होत नाही. ती लवकर होउन पीडितेला न्याय मिळावा या मागणीसाठी अण्णा आत्मक्लेश करीत आहेत. स्वतः आत्मक्लेश करून हजारे हे महिलांना अन्यायाविरोधात लढण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत.
महिलेवर अत्याचार झाल्यानंतर पोलिस ठाण्यात, रुग्णालयात महिला अधिकारी, वैद्यकीय अधिकारी त्यांची फिर्याद घेतील, वैद्यकीय तपासणी करतील असा कायदा २०१२ मध्ये संमत झाला.
मात्र, त्याची अद्यापही अंमलबजावणी झाली नसल्याची खंत या वेळी विद्यार्थिनींनी व्यक्त केली. हजारे यांनी आजवर केलेली सर्व आंदोलने यशस्वी झाली, हे आंदोलनही यशस्वी होईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी दिलेल्या लेेखी संदेशात हजारे म्हणतात, देशात आर्थिक, सामाजिक समानता असायला हवी, परंतु देशात अन्याय, अत्याचार वाढू लागल्याने चिंता निर्माण झाली आहे.
अत्याचारानंतर पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न होतात. गुन्ह्याच्या तपासास जाणीवपूर्वक विलंब लावण्यात येतो. त्यामुळेच महिलांवरील अत्याचाराच्या आरोपींना तत्काळ शिक्षा मिळाली पाहिजे. अन्यायग्रस्त महिला, युवतींचे प्राण घेतले जातात.
अशा घटना घडू नयेत यासाठी अशा नराधमांना तत्काळ शिक्षा होऊन न्याय मिळाला पाहिजे. पारनेर तालुक्यातील लोणीमावळा, कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अत्याचाराच्या घटनांबरोबरच देशभर घडत असलेल्या अशा घटना दुर्दैवी आहेत. केवळ दिल्लीच्या निर्भयाचे नाव आपण प्रातिनिधिक स्वरूपात घेतले आहे.
कोपर्डी व लोणीमावळा येथे शाळकरी विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांबाबतही आपण पंतप्रधान, राष्ट्रपती तसेच कायदा मंत्र्यांना लिहिले आहे.