अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :- नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयामार्फत ग्रामीण भागातील उपजिल्हा रुग्णालये व ग्रामीण रुग्णालयांना लस दिली जाणार आहे.
पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालय, कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालय तसेच जामखेड, शेवगाव, श्रीरामपूर, राहाता, संगमनेर, अकोले, श्रीगोंदे, नेवासे, कोपरगाव या तालुक्यातील ग्रामीण आरोग्य केंद्रांना पहिल्या टप्प्यात कोरोनाची लस दिली जाणार आहे.
नगर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत नगर शहरात लस वितरित केली जाणार आहे. नगर शहरात आठ ठिकाणी कोरोना लसीकरण केले जाणार आहे.
यात जिल्हा शासकीय रुग्णालयासह महापालिकेचे तोफखाना प्राथमिक आरोग्य केंद्र, मुकुंदनगर प्राथमिक आरोग्य केंद्र, जिजामाता आरोग्य केंद्र, नागापूर आरोग्य केंद्र, केडगाव आरोग्य केंद्र, सिव्हिल हेल्थ पोस्ट, महात्मा फुले आरोग्य केंद्र व बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात लस दिली जाणार आहे, अशी माहिती मिळाली.
नगर जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील २ उपजिल्हा शासकीय रुग्णालये व ११ ग्रामीण रुग्णालयांना लागणारी कोरोना लस गुरुवारी जिल्हा परिषदेच्या औषध कक्षातून जिल्हा शासकीय रुग्णालयास देण्यात येणार आहे. १६ जानेवारीपासून प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होईल. नगर जिल्ह्यात पहिल्या दिवशी २१ केंद्रांवर लस दिली जाणार आहे.
त्यात नगर जिल्हा शासकीय रुग्णालयाचाही समावेश आहे. लस आणण्यासाठी जिल्हा परिषदेचे एक वाहन पुण्याकडे सकाळी रवाना झाले.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या औषध कक्षातील शीतगृहात आलेली लस ठेवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवेत काम करणाऱ्या ३१ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार आहे. लसीकरणाची जिल्हा प्रशासनाच्या वतीने तयारी करण्यात आली आहे.