संगमनेर : तालुक्यातील अकलापूर येथील भोरमळा येथे पिंजऱ्यात अडकलेला बिबट्या गज वाकवून पसार झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
अकलापूर शिवारातील भोरमळा याठिकाणी तेजस मधे यांनी प्रताप भोर यांची शेती वाट्याने केली आहे. शुक्रवार दिनांक १७ एप्रिल रोजी रात्री सात ते आठ वाजेच्या दरम्यान ते कांद्याला पाणी भरत होते.
यावेळी त्यांच्या जवळ असलेल्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता; पण मधे यांनी आरडाओरड केल्यामुळे बिबट्या पळून गेला होता. वनविभागाने दुसऱ्या दिवशी याठिकाणी पिंजरा लावला होता.
दोन दिवसांपूर्वी रात्री बिबट्या त्यात अडकला होता; मात्र या बिबट्याने दातांच्या साहय्याने गज वाकवले आणि आपली सूटका करून घेतली.
दुसऱ्या दिवशी वनविभागाचे आधिकारी रामदास थेटे यांना ही घटना समजताच त्यांनी पिंजऱ्याची पाहणी केली. यावेळी पिंजऱ्याची फळीही निघून गेलेली दिसून आली.
कारागिराला बोलावून पिंजरा दुरूस्त करून घेण्यात आला. ठिकठिकाणी कांदे काढण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे मेंढपाळ मेंढ्या घेऊन परिसरात आले आहेत.
त्यांच्या मागे बिबटेही आले आहेत.हे बिबटे या मेंढ्यांना ठार करत आहेत. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.