‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्रात जे लिहिले आहे, तेच मोदी सरकारने कृषी विधेयकाबाबत केले !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-काँग्रेसच्या अजेंड्यामध्ये जे होते, तसेच महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्रात जे लिहिले आहे, तेच मोदी सरकारने कृषी विधेयकाबाबत केले आहे.

त्यामुळे महाविकास आघाडीच्या शिल्पकाराचे किमान आत्मचरित्र वाचावे, नंतरच कृषी विधेयकाला विरोध करावा, असा सल्ला भाजपा प्रदेश सचिव आणि रत्नागिरी जिल्हा प्रभारी प्रमोद जठार यांनी चिपळूण येथील पत्रकार परिषदेत दिला. कृषी विधेयकाला होत असलेल्या विरोधावरून विरोधकांवर जोरदार निशाणा साधत ते म्हणाले की,

जय जवान, जय किसान ही आमची घोषणा आहे. त्यासाठी भाजप वाटेल ते करण्यासाठी तयार आहे. केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाला ठाकरे सरकारने स्थगिती आणली आहे. मात्र, महाविकास आघाडीचे प्रणेते, केंद्रात १० वर्षे कृषी मंत्री असलेले शरद पवार यांचे ‘लोक माझे सांगाती’ आत्मचरित्र आहे.

त्यात पान क्रमांक २३७ व २३८ मध्ये स्पष्ट उल्लेख आहे की, ‘एपीएमसी ॲक्ट संपवला पाहिजे. शेतकऱ्याला शेतमाल कोठेही विकायला बंदी नसावी, आदी मुद्यांचा उल्लेख आहे. जे पवार यांच्या मनात होते, जे पुस्तकात लिहिले आहे. तेच मोदी सरकारने कृषी विधेयकाबाबत केले आहे.

यामुळे आपल्या शिल्पकाराचे किमान आत्मचरित्र वाचावे, असा सल्ला महाविकास आघाडीचे नेते आणि मंत्र्यांना प्रमोद जठार यांनी यावेळी दिला. शरद पवार जे बोलतात ते कधी करतात का, हा प्रश्न आहे. आत्मचरित्रात एक आणि आघाडी सरकारमध्ये एक अशी परिस्थिती पाहावयास मिळत आहे.

मोदी सरकारने केलेले कृषी विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचे आहे. भविष्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या भाजपा सहन करणार नाही. पंतप्रधान मोदींनी देशाच्या सीमेवरील जवानांना ताकद दिली. त्यामुळे आज कुठलेही राष्ट्र आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने बघू शकत नाही. आमचा एक मारला तर आम्ही सर्जिकल स्ट्राइक करून दहा मारू, हे त्यांनी दाखवून दिलेले आहे.

मोदी जवानांसोबत दिवाळी साजरी करीत आहेत. त्याप्रमाणेच शेतकऱ्यांचे रक्षण करण्याची भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. यामुळे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस नेते व मंत्र्यांनी श्री. पवार यांचे आत्मचरित्र वाचले पाहिजे, असा सल्लाही जठार यांनी दिला.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी आवश्यक असणारी पेढे परशुराम येथील जागा सरकारने संपादित केली आहे. त्या जागेचे पैसे न्यायालयाकडे जमा करण्यात आले आहेत. पन्नास टक्के रक्कम कुळांनी घेऊन स्वखुशीने जागा सोडावी, असे आवाहन जठार यांनी यावेळी केले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24